Home MAHARASHTRA स्वा. सावरकर जयंतीनिमित्त 28 ते 30 मे दरम्‍यान त्रिदिवसीय महोत्‍सव

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त 28 ते 30 मे दरम्‍यान त्रिदिवसीय महोत्‍सव

0
प्रफुल्ल माटेगांवकर अंदमानच्या सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती साकारणार
‘लाईट अँड साऊंड शो’ हे देखील मुख्‍य आकर्षण

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त “अंदमान एक तीर्थक्षेत्र…” या त्रिदिवसीय महोत्सवाचे व्‍हॉलिबॉल मैदान, लक्ष्‍मीनगर, आठ रस्‍ता चौक, नागपूर येथे 28 ते 30 मे दरम्‍यान आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्‍यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्‍या संकल्‍पनेतून हा भव्‍य महोत्‍सव साकारला जातो आहे.

त्रिदिवसीय व्‍याख्‍यानमालेचे 28 रोजी उद्घाटन

“अंदमान एक तीर्थक्षेत्र…” या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी 6.30 वाजता व्‍हॉलिबॉल मैदानावर 28 ते 30 मे दरम्‍यान त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्‍यात आली आहे. या व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन गुरुवार, 28 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता मान्‍यवर अतिथींच्‍या उपस्थितीत होईल. उद्घाटन सत्रानंतर “स्वा. सावरकर जाणून घेतांना” या विषयावर अमृत वक्ते विवेक घळसासी वक्तव्य करणार आहेत.

शुक्रवारी 29 मे रोजी “हिंदुत्व…” या विषयावर प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे तर शनिवार, दि 30 मे रोजी “समाज क्रांतिकारक सावरकर” या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोणी विचार मांडतील.

प्रथमच साकारणार अंदमानच्या सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती

स्वा. सावरकर जयंती निमित्ताने नागपुरातील हरहुन्नरी कलाकार प्रफुल्ल माटेगांवकर हे अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची भव्य हुबेहुब प्रतिकृती व्‍हॉलिबॉल मैदानावर साकार होत आहे. ज्‍या ठिकाणी स्‍वा. सावरकर यांच्‍यासह अनेक स्‍वातंत्र्यवीरांनी काळ्या पाण्‍याची शिक्षा भोगली होती, त्‍या ऐतिहासिक सेल्‍युलर जेलची अशा प्रकारची प्रतिकृती संपूर्ण भारतामध्‍ये पहिल्‍यांदाच नागपुरात उभी राहात आहे.

व्‍यवसायाने सिव्‍हील इंजिनीयर असलेले कलाकार प्रफुल्‍ल माटेगावकर यांनी अंदमान येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जेलचे मोजमाप करत त्‍याचे ग्राफिकल ड्रॉईंग आणि बारकाईने अभ्यास करून CAD व लेझर कटिंग तंत्रज्ञाच्या साहाय्याने सेल्‍युलर जेलची हुबेहुब 70×80 फूट आकाराची प्रतिकृती साकारण्‍यास सुरुवात केली. याचे काम आता अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. प्रफुल्ल माटेगावकर यांच्यासह आर्किटेक्ट लक्ष्मी पत्रकार, हर्षद भीसीकर, सुदामा इंगळे, महेश वानखेडे, मनमोहन सिंग, आदित्य राठोड हे कलाकार अहोरात्र मेहनत करत आहेत.

या भव्य प्रतिकृतीमध्‍ये काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान क्रांतिकारकांवर झालेल्या अत्याचारांचे मूर्तीमंत स्वरूप साकार होत आहे. खरे तर अंदमान च्या सेल्युलर जेलची ही प्रतिकृती देखील ते घरीच छोट्या आकारात साकारणार होते. मात्र श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्‍यक्ष संदीप जोशी यांच्‍या आग्रहास्‍तव सेल्‍युलर जेल आता भव्य स्वरूपात उभा राहात आहे. यापूर्वी प्रफुल्‍ल माटेगांवकर यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराची अतिशय देखणी प्रतिकृती तयार केली होती. या श्रीराम मंदिराच्‍या प्रतिकृतीला अनेक मान्‍यवरांनी भेट देऊन माटेगावकर यांचे कौतुक केले होते.

“लाईट अँड साऊंड शो” मुख्‍य आकर्षण

या तीन दिवसीय सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्‍हणजे “लाईट अँड साऊंड शो” होय. सेल्‍युलर जेलच्‍या प्रतिकृतीच्‍या आत व‍िव‍िधरंगी लाईट्स लावण्‍यात येणार असून त्‍याला निवेदन व संगीताची जोड देत अतिशय देखणा असा लाईट अँड साऊंड शो सादर केला जाणार आहे. या माध्‍यमातून नागरिकांना इतिहासाचा, क्रांतिकारकांनी सोसलेल्या वेदनांचा जिवंत अनुभव घेता येणार आहे. दररोज सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रम सुरू होण्‍यापूर्वी तसेच व्याख्यान संपल्‍यानंतर या “लाईट अँड साऊंड शो” अद्वितीय अनुभव रसिकांना घेता येईल.
हा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांसह देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना मानवंदना ठरणार असून नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचविणे, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजावून सांगणे तसेच समाजात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे, हा उद्देश असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला प्रफुल्ल माटेगावकर यांनी संबोधित केले. यावेळी नीरज दोन्तुलवार, मनोज देशपांडे, गजानन निशितकर, जयंत आदमाने यांची उपस्थिती होती.

 

#SavarkarJayanti #VeerSavarkar #AndamanEkTirthkshetra #Nagpur #SandeepJoshi #PrafullMategaonkar #CellularJail #LightAndSoundShow #AndamanCellularJail #HistoryOfIndia #FreedomFighters #राष्ट्रभक्ती #स्वासावरकर #Savarkar143 #NagpurEvents #CulturalEvent #PatrioticEvent #Hindutva #SharadPonkshe #VivekGhalsasi #AshutoshAdoni #IndianHistory #Andaman #SoundAndLightShow #YouthInspiration #ShriSiddhivinayakSevaTrust #NagpurNews #MaharashtraNews #ShankhnaadNews