पोलिसांच्या कारवाईत दलम कमांडरसह तीन नक्षलवादी ठार

0

नागपूर: गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सी-६० कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत पेरिमिली दलम कमांडर बिटलू मडावीसह तीन नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी (Gadchiroli Police action) सांगितले. नक्षलवाद्यांची पेरिमिली आणि अहेरी दलम माने राजाराम ते पेरिमिली सशस्त्र चौकीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील केडमारा जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोधमोहीम राबवण्यासाठी प्राणहिता येथून दोन सी-६० पथके रवाना करण्यात आली होती. या दरम्यान, नक्षलवाद्यांनी सी-६० पथकांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर शोधमोहिमेच्या दरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी याच्यासह इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमचा वासू आणि अहेरी दलमचा श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी वासूला पेरमिली एलओएसच्या २०२३ मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत याला उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. बिटलू मडावी हा या वर्षी ९ मार्च रोजी विद्यार्थी साईनाथ नरोटे यांच्या हत्येसह फेब्रुवारी २०२३ मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता. या कारवाईनंतर ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोलीत आणले गेले आहेत.