नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्यावरून निर्माण झालेल्या वादाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र (SIT to enquire incidence in Trimbakeshwar Temple) फडणवीस यांनी दिले असतानाच या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी वेगळाच दावा केलाय. त्र्यंबकेश्वर येथे उरुस आयोजित करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar City) उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात, असा दावा आयोजकांनी केलाय.
मागील दोन दिवसांपासून हा वाद सुरु आहे. मात्र हा वाद त्याच दिवशी निवळल्याचे सांगण्यात आले. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत मौन बाळगून असलेल्या उरुस आयोजकांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. मात्र, देवस्थानकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी देखील दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत हा वाद गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट करत वाद मिटल्याचे सांगितले.
त्र्यंबकेश्वर येथील महादेवाच्या मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यात दरवर्षी उरूसचे आयोजन केले जाते. दर्ग्याला चादर चढवल्यानंतर डोक्यावर फुलांच्या माळा आणि चादर घेऊन त्र्यंबकेश्वर नगरीतून मिरवणूक काढली जाते. यंदा देखील याच पार्श्वभूमीवर उरुसाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर उरुसातील सेवेकरी मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात, ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु असल्याचा दावा आयोजकांनी केलाय. वाद झाला त्यादिवशी देखील धूप दाखवण्यासाठी आलो होतो. उत्तर दरवाजाजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, असा दावा उरुसचे आयोजक मतीन सय्यद यांनी केला. यावर्षीच असा वाद निर्माण का झालाय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.