न्यूयॉर्क : मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर पुन्हा डाऊन झाले आहे. मागील तासाभरापासून ट्विटरचे असंख्य वापरकर्ते कुठलेही ट्विट पाहू शकत नाही. यासंबंधी जगभरातून अनेक लोकांनी आपल्या तक्रारी केल्या असून सोशल मीडियावर #TwitterDown असा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ट्विटरची सेवा काही तासांसाठी बंद झाली होती. त्यावेळीही वापरकर्त्यांना कुठलाही नवा मेसेज दिसत नव्हता तसेच ते कोणतेही नवी पोस्ट करू शकत नव्हते. सध्या प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यामुळे ट्विटरवरून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटरच्या सेवा डाऊन झाल्या (Twitter Down Globally) आहेत.
अमेरिका, इंग्लंड, जपानसह भारतातूनही ट्विटर फिड व पोस्ट संदर्भात तक्रारी येत आहेत. वापरकर्त्यांना ट्विटरच्या सेवांचा लाभ घेता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. जगभरातील वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवणाऱ्या डाऊन डिटेक्टर या वेबसाइटला ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ट्विटरच्या सेवा डाऊन झाल्यानंतर फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतो आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.