उद्धव ठाकरे कुणाला पचनी पडलेले नाहीत,प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा टोला

0

 

नागपूर :उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. मविआच्या वज्रमूठीला तडे गेले आहेत. त्यांच्या सभांना लोक येत नाही, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागणार आहे.
ते नागपूर येथे विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. ज्यावेळी उध्दव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदी यांचेवर स्तुतीसुमने उधळीत होते.आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने तुम्हाला विरोध करणे भाग आहे. बारसूची जनता ठाकरे यांना तिथे येऊ देणार नाही असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडीविषयी ते म्हणाले, तो त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, नंतर निर्णय घेतील. दरम्यान,राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही , कुणी संपर्क केला,कोणी आले तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे.आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही तर एक राजकीय पक्ष आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंग बलीचा नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसने बजरंग दलाबाबत घेतलेला निर्णय याविषयी जनता मतांमधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपाला विजय मिळणारच आहे तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका बसणार आहे असा दावा बावनकुळे यांनी केला.