
आरोपी ताब्यात; भंडाऱ्यातील अजीमाबादच्या विटभट्टी येथील घटना
भंडारा. मामा-भाच्याने एकत्रच दारू ढोसली. अचानक त्यांच्यात वाद उफाळून आला. मद्यच्या धुंदीतच भाच्याने मामाचा खून केल्याची (Nephew killed uncle) खळबळजनक घटना भंडाऱ्यातील कारधा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अजीमाबाद (Azimabad under Kardha Police Station in Bhandara) येथे घडली. अजिमाबाद गावाच्या शेतशिवारात विटाभट्टीचा उद्योग आहे. या विटाभट्टीच्या कामासाठी छत्तीसगड (Chhattisgarh ) राज्यातील कामगार कामावर आहेत. राजू मनहारे (33) असे मृत मामाचे तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (18) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. दोघेही मूळचे छत्तीसगडच्या सलोनी, जिल्हा बलोदाबाजार येथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, कारधा ठाणेदार राजेशकुमार थोरात पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले असून आरोपी भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील अजिमाबाद गावाच्या शेतशिवारात विटभट्टीचा उद्योग सुरू आहे. या विटभट्टीच्या कामासाठी विटभट्टी मालकाने छत्तीसगड राज्यातील कामगार कामावर आणले होते. त्यात या मामा-भाच्याचा समावेश होता. हे दोघेही भट्टी परिसरात अन्य कामगारांसह एका झोपडीत राहत होते.
रविवारी त्यांनी भट्टी मालकाकडून आठवड्याचा आर्थिक मोबदला घेऊन रात्रीच्या जेवणासाठी मासोळी विकत घेतली. त्यानंतर दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत मामा भाच्यात वाद झाला. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने भाच्याने मामाला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्र्विती राव, कारधा ठाणेदार राजेशकुमार थोरात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे, सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे.
मातीच्या खड्ड्यात पडून होता मृतदेह
दारु प्यायलानंतर दोघांमध्येही वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे भाच्याने मामावर हल्ला केला. त्यानंतर मामाला मारण्यासाठी भाचा मागे धावला. यामध्ये मामा रात्रीच्या अंधारात विटांसाठी बनवलेल्या मातीच्या खड्ड्यात मामा पडला आणि त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. तुर्त भाच्याची चौकशी करण्यात येत आहे.