
घरी येऊन मारण्याची धमकी, धामणगाव तालुक्यातील प्रकार
अमरावती. शाळा सुरू असताना युवक थेट वर्गात शिरतो. उपस्थित विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याचे फर्मान सोडतो. विद्यार्थी बाहेर पडत असतानाच, एकीला थांबवून घेतो. माझ्यासोबत लग्न करावेच लागेल, अशी धमकी देतानाच विनयभंग करून निघून जातो. ऐन प्रजासत्ताक दिनी पुन्हा तिची वाट अडवून लग्नासाठी दबाव टाकतो. एखाद्या चित्रपटातील हा प्रसंग वाटावा अशी ही घटना धामणगाव तालुक्यात (Dhamangaon Taluka ) घडली. एकतर्फी प्रेमातून (one sided love ) ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपी सतत त्रास देत असल्याने मुलीने आईला याबाबत माहिती दिली. आईने थेट तळेगाव दशासर पोलिस ठाणे (Talegaon Dashasar Police Station ) गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी आरोपी चेतन संजय निवल (२६) रा. जळका पटाचे, ता. धामणगाव याच्याविरूद्ध विनयभंग, धमकी, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडिता राहते. २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास १३ वर्ष ९ महिने वयाची पीडित विदयार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना आरोपी चेतन निवल हा दुचाकीने मागून आला. रस्ता अडवुन तुझे फोटो काढून मला पाठव, नाही पाठविले तर घरी येऊन मारेन, अशी धमकी तिला दिली. तत्पुर्वी, १५ दिवसांआधीसुद्धा आरोपी हा पिडीतेच्या शाळेत जाऊन तिच्या वर्गात शिरला होता. वर्गातील मुला मुलींना बाहेर काढले. आपल्या सोबत लग्न कर असे तो दरडावणीच्या सुरात म्हणाला. पीडीताने त्यास नकार दिला असता, तो तेथून निघून गेला. २६ जानेवारी रोजी देखील त्याने छेडखानी केल्याने ती बाब तिने आईला सांगितली. तिच्या आईने तिला घेऊन गुरूवारी पोलिस ठाणे गाठले.
चालत्या दुचाकीवरून मुलीची उडी
ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या छेडखानीच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. खोलापूर पोलिस ठाण्याच्या हददीत राहणारी १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी बसस्टॅंडवरून पायदळ घरी जात असताना आरोपी सागर अंबाडकर (३०) रा. कसबा खोलापूर याने तिचा पाठलाग केला. तिच्याशी खोटे बोलून तिला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यादरम्यान त्याने तिच्याशी अश्लिल कथन करीत विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली. त्यामुळे ती जखमी झाली आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. खोलापूर पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी सागर अंबाडकरविरूद्ध गुन्हा दाखल केला.