राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस

0

नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांना फटका

नागपूर-.(Nagpur)भर उन्हाळ्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारे, पाऊस, गारपिटीने विजांच्या कडकडाटात हजेरी लावल्याने (Unseasonal rain all over the state) तापमान कमालीचे कमी झाले आहे. रात्रीपासूनच सर्वत्र पावसाचा जोर दिसून येत आहे. विदर्भातही (Vidarbha ) जवळपास सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. सततच्या पावसामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस,गारपिटीचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. हवामान विभागाने (Meteorological Department ) ५ मे पर्यंत अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. आता पाऊस थांबून उन्ह तापू दे, असे साकडे शेतकरी घालत आहेत.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी ८.३० पर्यंत (Amravati)अमरावतीत सर्वाधिक ६३ मिमी, त्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात ३६ मिमी पावसाची नोंद झाली. नागपुरातसुद्धा मध्यरात्रीपासूनच पाऊस कोसळतो आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नागपुरात १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. अगदी पावसाळ्याचा फिल येत असल्याने सुटीचा दिवस असूनही नागपूरकरांना सकाळपासून घराबाहेर पडताच आले नाही. साऱ्यांचाच दिवस आज उशीराने सुरू झाला. बाहेर जाऊन मौजमजा करण्यापेक्षा घरातच चमचमीत मेनूवर ताव मारण्यावर नागपूरकरांचा भर असल्याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाने विदर्भासाठी रविवारी संपूर्ण दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवार आणि मंगळवारीसुद्धा ऐलो अलर्ट कायम असून बुधवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे. पावसामुळे किमान तापमानातही कमालीची घट झाली आहे. वातावरणात चांगलाच गारवा जाणवतो आहे.
सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांना अद्याप मशागतपूर्व कामे आटोपता आली नाहीत. पाऊस थांबल्यानंतर आखी काही दिवस कडक उन्ह पडल्यानंतरच मशागतीची तयारी करता येणार आहे. पण, पाऊस थांबणार तरी कधी, याबाबत कोणतीही स्पष्टता तुर्ततरी नाही. अशात उन्ह तापण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

 

 

 

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117