Home MAHARASHTRA विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस

0

(Nagpur)नागपूर-विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. काल दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाच्या सरींनी नागपूर, गोंदिया, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या प्रामुख्याने पाच जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागने पावसाचा यलो अॅलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने किरकोळ हजेरी लावलेली आहे. आगामी दोन ते तीन दिवस वातावरण याचप्रमाणे राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने आज बैठक बोलावली आहे. (Rain in Vidarbha)
विदर्भात अनेक भागात यंदा पेरण्या उशिराने झाल्या होत्या. त्यामुळे पिकांच्या काढणीलाही उशिर झाला असून अशा शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रामुख्याने कपाशी, तूर, सोयाबीनला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यवतमाळमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. नागपुरातही रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु असल्याने वातावरणात गारठा निर्माण होऊन तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे.

विदर्भ व मराठवाड्यासह अनेक भागात अवकाळी पावसाने शेतीवर संकट निर्माण केले आहे. त्यामुळे आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकारकडूनही माहिती मागविण्यात आली आहे.