हापूड, 10 जून : उत्तरप्रदेशच्या हापूड येथील चंडी मंदिरात नमाज पठन करणाऱ्या मुस्लीम इसमाला पोलिसांनी अटक केलीय. मंदिरात नमाज पठनाच्या अनपेक्षित घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या इसमाला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद अक्रम असे आहे.
हापूड येथील चंडी माता मंदिरात मोहम्मद अकरम नामक मुस्लीम इसमाने नमाज पठन केल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले असता पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले. दोन धर्मात तेढ निर्माण केल्याचे कृत्य करणाऱ्या अक्रमने पोलिसांना सांगितले की, आपल्यासाठी मंदिर आणि मशिद समान असल्यामुळे आज मंदिरात जाऊन नमाज पठन करावे असे आपल्या मनात आले. त्यामुळे हे कृत्य केल्याची सबब अक्रमने सांगितली. दरम्यान अक्रमने केलेले कृत्य अयोग्य असून इतरांचा धार्मिक स्थळावर जाऊन नमाज पठन करणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलेय. दरम्यान पोलिस आरोपी अक्रमची चौकशी करीत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.