बुलडाणा : भारतीय हवामान खात्याने 14 ते 16 मार्च दरम्यान बुलडाण्यात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.. यंदाच्या मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, काढणीला आलेली गहु, हरबरा, मका, तसेच रब्बी पिकं या पावसामुळे प्रभावीत झाली आहेत. आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा, संभाव्य अवकाळी पावसाची शक्यता पाहता,परिपक्व झालेल्या हरभरा,गहु आदी पिकांची त्वरीत कापणी करावी व कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. कापणी, तोडणी केलेली फळे, भाजीपाला सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जेणेकरून संभाव्य पावसाने फळांची व भाजीपाल्याची गुणवत्ता खालावणार नाही..तसेच मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत..विजांबाबत अचूक पूर्वसूचना प्राप्त होण्यासाठी व जिवीतहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा..असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या कडून करण्यात आले आहे.