खोल विहिरीत पडून मृत्यू : चार तासांनंतर मृतदेह आढळला
वरूड (warud) घरीच दोघे भाऊ खेळत होते. त्याचवेळी पतंग विहिरीवर ठेवलेल्या टिनपत्रावर येऊन पडली. पतंग मिळविण्याच्या नादात अवघ्या चार वर्षीय मुलगा विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला (little one lost his life). ही दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजीकच्या धनोडी (Dhanodi near Varudan in Amravati district ) येथे घडली. त्यानंतर लागलीच मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण, काही केल्या तो हाती लागत नव्हता. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेहच पाण्याबाहेर काढण्यात आला. शिवा ऊर्फ शिवांश सुमित मानकर (४) रा. आंबेडकरनगर, धनोडी असे मृताचे नाव आहे. तो चुलत भावासमवेत आवारात खेळत होता. यादरम्यान एक पतंग घरातील विहीर झाकण्यासाठी ठेवलेल्या टिनपत्र्यावर पडला. तो पतंग काढण्याकरिता शिवा पत्र्यावर गेला आणि त्यासह विहिरीत कोसळला. त्याच्यासोबत खेळत असलेल्या चुलतभावाने लगोलग शिवा विहिरीत कोसळल्याची माहिती घरातील लोकांना दिली.
विहिर टिनपत्रा ठेवून झाकून ठेवण्यात आली होती. पतंगही नेमकी त्यावरच येऊन पडली. पतंग घेण्यासाठी शिवा वर चढला आणि टिनपत्रासह विहिरीत पडला. घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली. लागलीच ग्रामस्थांनी विहिरीलगत गर्दी केली. त्याला बाहेर काढण्याचेही प्रयत्न करण्यात आले. कुटुंबीयांची धावपळ सुरू असतानाच शेंदूरजनाघाट पोलिस पथक ठाणेदार सतीश इंगळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर विहिरीतील पाण्याचा अतिरिक्त १० अश्वशक्तीचा पंप लावून उपसा करण्यात आला. अखेरीस चार तासानंतर दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह दृष्टीस पडला.
आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर
एकुलत्या एक मुलाचा अचानक विहिरीत पडून मृत्यू झाल्याने आई- वडिलांसह मानकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वच धाय मोकलून रडत होते. शिवा विहिरीत कोसळल्यानंतर लगोलग काका गौरवने विहिरीत उतरून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. या धावपळीत गौरवच्या हातालासुद्धा लागल्याने तो जखमी झाला. मुलाच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.