अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले आहे. अनेक समस्यांची सोडवणूक त्यामुळे होताना दिसते. मात्र, समाज माध्यमांचा गैरवापरही करण्यात येत आहे. प्रामुख्याने असामाजिक तत्वांकडून बदनामीसाठी त्याचा वापर केला जात असल्याचे अनेक प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. असेच काहीसे प्रकरण अमरावतीतही उजेडात आले आहे. मुंबईत राहणाऱ्या आरोपीने अमरावतीच्या युवतीवर प्रेमाचे जाळे टाकले. दबाव टाकत तिच्यावर अत्याचार केला. एकांतातील क्षणांचे छायाचित्र देखील काढले. नंतर हेच फेटो इऩ्स्टाग्रामवर टाकून तिची बदनामीही केली. पीडितेने सातत्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. पण, आरोपी काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता. तिकडे बदनामी होत असल्याने तिने थेट राजापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व बदनामीचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
हरिष मधुकर तायडे (४५) रा. नवी मुंबई असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी दवाखान्यात कामाला आहे. तिथेच वडिलांसोबत राहतेसुद्धा. फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडितेची दवाखान्यातच आरोपीसोबत पहिली भेट झाली. आरोपीने जवळीक वाढविणे सुरू केले. १० फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीस फोन करून भेटायला ये नाहीतर मी तुझे जिवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी दिली. भीती आणि कामाच्या ठिकाणी बदनामी होण्याची शक्यता असल्याने ती भेटायला गेली. आरोपीने संधी साधून तिच्यवर अत्याचार केला. घटनेबाबत कुणालाही माहिती न देण्याची धमकी त्याने दिली होती. या घटनेनंतर त्याची हिंमत चांगलीच वाढली. तो एकदिवस दवाखान्यातूनच पीडितेला सोबत घेऊन गेला. लॉजवर नेऊन पुन्हा अत्याचार केला. माझ्यासोबत असलेले तुझे फोटो व्हायरल करतो. अशी धमकी तिला दिली. त्यानंतर पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले.
आरोपीने इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून पिडिताचे काही फोटो अपलोड केले. मैत्रिणींकरवी पीडितेला याबाबत माहिती मिळाली. तिने या प्रकारबाबत त्याला जाब विचारला. मात्र, त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याने पीडितेसोबत लग्न केले असल्याचा मेसेज व्हायरल केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर पीडितेच्या कुटुंबातील लोकांना तिला माझ्या घरी आणून द्या, मला तिचे सोबत लग्न करायचे असल्याचे बजावले. आपली इच्छा पूर्ण केली नाही तर जिवाचे बरे वाईट करण्याची धमकीही दिली.