“जखमी ‘वाघ” कुठलाही असो, इलाज करावाच लागतो…” : सुधीर मुनगंटीवार

0

नागपूर : “वाघांच्या स्थानांतरणाचा कार्यक्रम आम्ही सुरु केलाय. ताडोबा व बफर झोनमधील काही वाघ नवेगाव-नागझिरा येथे स्थानांतरित करीत आहोत. वाघ कुठलाही असो त्या वाघांचे, योग्य स्थानांतरण करण्याची आवश्यकता आहे. मग तो वाघ ताडोब्याचा असो की जिल्ह्याचा असो की राजकारणातला असो.. त्याचे स्थानांतरण योग्य ठिकाणी करण्याची आमची जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडत आहोत. ४० वाघ झालेच ना स्थानांतरित. योग्य ठिकाणी त्यांचे स्थानांतरण झाले आहे. तेच त्यांच्यासाठी पोषक असते. जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर करतो आहोत. त्या सेंटरमध्ये जखमी वाघांचा योग्य इलाज, उपचार केला जाईल. जखमी वाघ कुठलाही असो, इलाज करावाच लागतो…”..या शब्दात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी नागपुरात बोलताना अतिशय स्पष्ट शब्दात विरोधकांचा आणि विशेषतः ठाकरे गटाचा समाचार घेतला.
प्रसार माध्यमांशी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उत्तर देत होते. विशेष म्हणजे सध्या वन विभागाकडून देखील वाघांच्या स्थानांतरणाची मोहिम सुरु आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाच्या प्रकरणाची सत्यता आहे की नाही, याचा तपास झाला पाहिजे. आरोपांचा स्त्रोत कुठला, त्यामागील तर्क काय आहेत? हे न सांगताच आरोप करण्यात येत असतील, तर भविष्यात एखादा खरा आरोपही लोकांना खरा वाटणार नाही. उठसूठ आरोप करण्याची फॅशन सुरु होईल, असे मतही मुनगंटीवार यांनी (Forest Minister Sudhir Mungantiwar) व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीबद्धल पोलिसांनी चौकशी करावी. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. अशा प्रकरणाच्या तपासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात, असेही ते म्हणाले. मुनगंटीवार म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाचे प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या प्रकरणात तथ्य आहे की नाही, याचा तपास झाला पाहिजे. आपण आरोप करायचा आणि मात्र आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचा नाही. हे कसे चालेल? पोलिसांनी त्यांच्याकडून ही माहिती घेतली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत गांभीर्याने लढत आहोत. जनता कोणाला आशीर्वाद देणार, हे निकालानंतर दिसणारच आहे. मतदारसंघात वेगाने काम करण्यासाठी जनता भाजप-शिवसेनेला आशीर्वाद देईल, असा विश्वास असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार योग्य वेळी होईल, असेही ते म्हणाले.