पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात थेट लढत आहे. या लढ्यात अपक्ष उमेदवार म्हणून नरेंद्र जिचकार त्याच्या कार्यकर्त्यांसह पुढे दिसत आहेत. सध्या चर्चेत असलेले रेशन किट या या मतदारसंघात राजकीय गदारोळ निर्माण करीत आहे. त्या रेशन किट नेमक्या कोणाच्या? हा देखील प्रश्न चर्चेत आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटीसाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. अशातच मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवित आहेत. नागपुरातील पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील एका उमेदवाराने आपल्या फोटोसह रेशन किट वाटप करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक किट जप्त करण्यात आल्या असून निवडणूक विभाग, अन्नपुरवठा व पोलीस यंत्रणांनी याची गंभीर दखल घेतली आहे. यावेळी 220 किलो वजन असलेल्या 220 किट बॅग जप्त करण्यात आल्या. आचारसंहितेचे उल्लंघन करून रेशन किटमध्ये आपल्या उमेदवारीचे, निवडणूक चिन्हाचे पत्रक टाकून प्रचार करण्याचा हा प्रकार केला. या सर्व प्रकारचे व्हिडीओ शहरातही व्हायरल झाले. विशेष म्हणजे मोतीबाग येथील मंगलवारी मार्गावरील सेंट्रल रेल्वे कॉलनीत शासकीय क्वॉर्टर सुरक्षित असल्याने तेथे शेकडो किट ठेवण्याचे गोदाम तयार केले. रविवारी रेशन किटची एक खेप एमएच-40/बीएल-6531 क्रमांकाच्या गाडीतून आली. एका जागरूक मतदाराने हा व्हिडिओ तयार करून याची माहिती नोडल अधिकारी राजीव गौतम यांना दिली व हे बिंग फुटले. हा व्हिडिओ रविवारी रात्री उशिरापर्यंत व्हायरल झाला. काही रेशन किट जप्त करण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीत किट वाटपाच्या प्रकरणावरून जोरदार चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र चिचकार यांनी आपल्या मतदारांना आणि प्रसारमाध्यमांना खुलासा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘माझ्यावर किट वाटल्याचा आरोप करण्यात आला असला, तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. एका सामाजिक संस्थेच्या निवेदनात माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. याउलट, जर कोणत्याही गरजू व्यक्तीला दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मदत मिळाली असेल, तर त्याचं मी स्वागत करतो.’
नरेंद्र चिचकार यांनी असेही म्हटले की, ‘माझ्यावर हा आरोप करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र, हे समाजकंटक गरजूंना अशा मदतीपासून वंचित ठेवू पाहत आहेत, हे मला मान्य नाही, आणि मी यासाठी त्यांना माफ करणार नाही.’