“तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही..”.. फडणवीस यांचा ठाकरेंना इशारा

0

 

मुंबई :”उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व व कारनामे आता एकेक करत जनतेपुढे उघड होत आहेत. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (घसा) केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही. बघूच आता कुणाला शवासन करावे लागते ते…,” या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.
फडणवीस म्हणाले की,”ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका”, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डागली.
विरोधकांची पाटणा येथील बैठक म्हणजे परिवाराची, परिवार वाचविण्याची बैठक असल्याच्या फडणवीस यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर प्रतिहल्ला चढविला होता. ठाकरे म्हणाले
की,”देवेंद्र फडणवीस एवढ्या खालच्या पातळीला येऊ नका. परिवार तुम्हाला देखील आहे. तुमचे ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’ ही बाहेर आलेत. आम्ही त्याच्यावर अजून बोललो नाही. मी बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल.”
उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली व ठाकरेंना इशारा दिला. फडणवीस पुढे म्हणाले की “चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा. सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले? यावर…, मुंबईला कुणी लुटले? यावर…, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? यावर…, मराठी माणसाला कुणी ओरबाडले? यावर…,100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते? यावर…,
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार,असेही ते म्हणाले.
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही.तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…असेही फडणवीस म्हणाले.