– बुटे, लांजेवार,पाठराबे यांना नारद पत्रकारिता पुरस्कार
नागपूर- आपल्या देशाची नाळ इथल्या संस्कृतीशी जुळलेली असून ती तोडण्याचे काम करणाऱ्या, खरा इतिहास न सांगता त्याची पराभूत दृष्टिकोनातून मांडणी करणाऱ्या प्रवृत्तींपासून समाजाने सावध राहण्याची ही वेळ आहे. अशावेळी, दोन्ही बाजू डोळसपणे पाहून पत्रकारांनी असत्य ते असत्यच असल्याचे ठणकावून सांगण्याच्या आपल्या शक्तीचा विसर पडू देऊ नये, असे प्रतिपादन दैनिक सकाळचे सहयोगी संपादक डॉ. अनंत कोळमकर ह्यांनी केले.
आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती पत्रकार सन्मान सोहळा उमरेड येथे शनिवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी ह्या नात्याने बोलताना डॉ अनंत कोळमकर पुढे म्हणाले की, आज पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकार विरोधात इतके बोलले किंवा लिहिले जात असेल तरी कुणाला त्याकरिता अटक झाल्याचे ऐकिवात नाही. देशात आणीबाणीच्या घटनेला आता पन्नासावे वर्ष सुरू होत आहे. त्याकाळी कुलदीप नय्यर ह्यांच्या सारख्या कितीतरी ज्येष्ठ पत्रकारांना कोणतेही कारण न सांगता तुरुंगात डांबण्यात आले होते. वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावर वरवंटा फिरविण्यात आला होता. ऐनवेळी अग्रलेखातील काही वाक्ये गाळावी लागल्याने अग्रलेखाचे स्थान कोरे सोडावे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी त्यांचे पती फिरोज गांधी ह्यांनी स्वतः खाजगी विधेयक मांडून पारित करवून घेतलेला आणि त्यांचे नाव असलेला फिरोज गांधी प्रेस फ्रीडम ॲक्ट बरखास्त केला होता. त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेली मंडळी आज पंतप्रधान मोदी ह्यांच्या अमेरिका भेटी निमित्त ‘भारतात प्रेस चे स्वातंत्र्य संपवले जात आहे’ अशी ओरड करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते तसेच ‘विदर्भ हुंकार’ मासिकाचे वृत्त संपाद राजेश जोशी यांनी प्राचीन काळातील भारतीय वैज्ञानिक आणि त्यांच्या ग्रंथातील दाखले देऊन आधुनिक संशोधनांवर प्रकाश टाकला. समाज माध्यमांच्या युगात पत्रकारांनी आपण राष्ट्रहित आणि लोकमंगल साधणाऱ्या प्राचीन जनसंवाद माध्यमाचे पाईक असल्याचा कधी विसर पडू देऊ नये, असे आवाहन केले.
पत्रकार सर्वश्री भूपेश पाठराबे, अभय लांजेवार आणि सुधीर बुटे यांना ह्यावेळी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाने गौरविण्यात आले. हा ग्रामीण पत्रकारितेचा सत्कार असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार कुमार ताले ह्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागील भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे संचालन ऍडव्होकेट जयंत दाणी यांनी तर आभार प्रदर्शन अमित तोंडे यांनी केले. ह्यावेळी, नागपूर जिल्ह्यातील पत्रकार आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.