विदर्भवाद्यांची विधानभवनावर धडक, अन्यायाविरोधात संताप

0

-मंत्र्यांनी भेटण्यास दिला नकार


नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर विदर्भवाद्यातर्फे हल्लाबोल मोर्चा आंदोलन केले गेले. या मोर्चाची सुरवात यशवंत स्टेडियमपासून झाली. बराच वेळ टी पॉइंटवर विदर्भवादी बसून राहिले. शिष्टमंडळाला भेटीस बोलावण्यात आले परंतु विदर्भवाद्यांनी विदर्भात अधिवेशन असताना कॅबिनेट मंत्र्यांनी भेटायला यावे असा हट्ट धरला. मात्र, सरकारने तो आग्रह नाकारल्याने अखेर सरकारचा निषेध केला गेला. विदर्भाचा आवाज बुलंद करणाऱ्या या आंदोलनात विदर्भवादी नेते ऍड. वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, रंजनाताई मामर्डे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबतुनवार, सुनील चोखारे, घनश्याम फुसे, गणेश शर्मा, नौशाद हुसेन, अहमद कादर, माजी मंत्री डॉ रमेश गजबे, उपेंद्र शेंडे,मोरेश्वर टेंभुर्डे, ऍड मुकेश समर्थ, नीरज खांदेवाले, सरोज काशीकर ,मुकेश मासुरकर आदीनी प्रामुख्याने मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारने विदर्भाचे राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्नधान्न्यावरील GST तात्काळ मागे घ्यावी, राज्य सरकारने जाचक वीज दर रद्द करावे, विदर्भातील 11 ही जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. बल्लारपूर, सूरजागढ रेल्वेमार्ग केंद्र सरकारने तात्काळ मंजुरीसह आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा, विदर्भातील गावरान जमिनीवरचे शेतकऱ्यांचे व रहिवासीयांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, विदर्भ वैधानिक मंडळ नको आता आम्हाला विदर्भ राज्यच हवे अशी मागणी जोरकसपणे करण्यात आली. टी पॉईंट परिसरात मोर्चा अडविण्यात आल्यानंतर विदर्भवाद्यांनी बराच वेळ ठिय्या देत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा