अपूर्व विज्ञान मेळ्याच्या प्रेरणेने शाळकरी मुलांमधून भविष्यातील उत्तम वैज्ञानिक घडतील – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0
  • विज्ञान संचारकांच्या सत्काराने मेळ्याच्या रौप्य महोत्सवी आयोजनाचे समापन

नागपूर :- असोसिशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर ( एआरटीबीएसई ) व नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय ( १६ ते २० नोव्हेंबर २०२२ ) २५ व्या रौप्य महोत्सवी अपूर्व विज्ञान मेळ्याच्या समारोपीय कार्यक्रम आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रभाषा भवन येथे करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर विज्ञान प्रसारचे संचालक डॉ. नकुल पाराशर, एसओए विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अमित बॅनर्जी, एआरटीबीएसईचे अध्यक्ष रघू ठाकूर, कार्याध्यक्ष राजाराम शुक्ल, ब्रम्हानंद स्वाइन तसेच सचिव सुरेश अग्रवाल उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाही. त्यांनी व्हिडिओ संदेशातून अपूर्व विज्ञान मेळ्याच्या रौप्य महोत्सवी आयोजनानिमित्त आयोजकांना व मंचावर उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या. मनपा संचालित शाळांमधून शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास या विज्ञान मेळ्यामुळे मदत होईल. तसेच या आयोजनातून प्रेरणा घेऊन भविष्यातील उत्तम वैज्ञानिक या शाळकरी मुलांमधील घडतील, असा विश्वास देखील त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण ज्योती मेडपिलवार यांनी केले. त्यानंतर एआरटीबीएसईचे सचिव सुरेश अग्रवाल यांनी आपल्या निवेदनात अपूर्व विज्ञान मेळ्याच्या गत २५ वर्षांच्या आठवणी आणि प्रवासाला उजाळा दिला. यावेळी त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या प्रयोगांची सुरुवात तसेच या प्रवासादरम्यान जोडलेल्या विविध व्यक्ती यांचे स्मरण केले व त्यांना सन्मानित केले. यात रघुदीप सिंग, सुषमा सुर्जन, जे एलएम गायत्री, संध्या वर्मा, व्ही. एस. एस. शास्त्री, राजेश पाराशर, संजय देशभ्रतार, ललित कुंभारे, चंद्रशेखर बांगीलवार, निखिलेश हरी आदींचा समावेश होता.
तसेच शालेय शिक्षणाला अधिक मनोरंजक, सोप्‍या प्रयोगांवर आधारित बनवण्‍याच्‍या अभियानात सक्रीय आलेल्‍या देशभरातून आलेल्या ४० विज्ञान संचारकांचा देखील यावेळी सत्‍कार करण्यात आला. यामध्ये गोवा, उत्‍तराखंड, उत्‍तरकाशी, बिहार, मध्‍य प्रदेश, उत्‍तर प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू कश्‍मीर, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर अशा एकूण १४ राज्यांतील विज्ञान संचारकांचा त्‍यात समावेश आहे.
गांधींच्या विचारांचे अवतरण असलेला विज्ञानाचा प्रयोगांचा हा अपूर्व मेळा आहे. विज्ञान आणि अवैज्ञानिक विचार यांच्यातील संघर्ष कमी व्हायला हवा, असे मत एआरटीबीएसईचे अध्यक्ष राघू ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे अत्यावश्यक आहे. जगातून युद्ध आणि अशांती नष्ट करणे हे विज्ञानाचे लक्ष्य असावे. तसेच जनसामान्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे महत्वाचे आहे, असे देखील ते म्हणाले.
विज्ञान, वैज्ञानिक आणि त्यापासून लाभ पोहोचणारा समाज यांना जोडण्याचे काम अपूर्व विज्ञान मेळ्याने केले आहे, असे प्रतिपादन ‘विज्ञान प्रसार’ या केंद्र शासनाच्या संस्थेचे संचालक डॉ. नकुल पाराशर यांनी केले. विज्ञान प्रसाराचा दिवा तेवत ठेवण्याचे काम या मेळ्याने केले आहे. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगावा अशी कृती करण्याचे प्रण करावे असे आवाहन केले. तसेच डॉ. कपिल त्रिपाठी यांनी केवळ साडेतीन वर्षांत विज्ञानावर आधारित ४००० रंजक माहिती देणाऱ्या फिल्म्स/व्हिडिओचे निर्माण केले. या फिल्म्स विज्ञान प्रसाराचे संकेतस्थळ आणि ॲप वर जाऊन बघण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
एसओए विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.अमित बॅनर्जी यांनी अपूर्व विज्ञान मेळ्याच्या आयोजनाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशभरात आयोजित होणाऱ्या विज्ञान मेळ्यांमध्ये अपूर्व विज्ञान मेळ्याचा रौप्य महोत्सवी लोगो वापरण्याची परवानगी देण्याचे व प्रसार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे आभार एआरटीबीएसईचे कार्याध्यक्ष ब्रम्हानंद स्वाइन यांनी मानले. अपूर्व विज्ञान मेळ्याच्या या आयोजनाला शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी नागरिक यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा