यवतमाळ : मुलांच्या हाती मोबाईल दिल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. ऑनलाईन गेम्स, पॉर्न, सोशल मिडियाच्या बेजबाबदार वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत असून त्यातून समाजमन अस्वस्थ करणाऱ्या घटना घडत आहेत. याबद्धल जनजागृती घडविण्याचे प्रयत्न सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील बान्सी ग्रामपंचायतने एक आदर्श असा निर्णय घेतला आहे. येथील ग्रामपंचायतीने किशोरवयीन मुलांसाठी मोबाईल फोन बंदीचा निर्णय घेतला आहे (Mobile Phones Banned For Teenagers in Bansi Village). 11 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत गावाने एकमताने हा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी ही राज्यातील पहिलीच ग्राम पंचायत असून या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
किशोरवयीन मुलांच्या हाती सहजपणे मोबाईल फोन येत आहेत. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी त्याचा वापर प्रचंड वाढला. आता किशोरवयीन मुलामुलींना मोबाईलचे व्यसन जडले आहे. ऑनलाईन गेम्स, सोशल मिडीयाच्या वापरासह पॉर्न साईट्सकडेही किशोरवयीन मुलांचा ओढा वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून ग्रामीण भागातही हेच चित्र दिसत आहे. गावांतील किशोरवयीन व तरुणवर्ग तासनतास मोबाईलमध्ये घालवत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
असा झाला निर्णय
हे चित्र पाहून बान्सी गावच्या ग्रामसभेने त्यावर चर्चा केली व मोबाईलचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालणारा निर्णय करण्यात आला. हा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. गावातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या गावाने मोबाईल फोन बंदीचा घेतलेला आगळावेगळा निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. असा निर्णय आणखी काही गावांकडून घेतला जाणार काय, अशी चर्चाही या निमित्ताने सुरु झाली आहे.