आता वर्षातून ४ वेळा मतदार नोंदणी ३ व ४ डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

0

चंद्रपूर २२ नोव्हेंबर – यापुर्वी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेल्या नवमतदारांना वर्षातुन एकदाच मतदार नोंदणी (Voter registration) करता येत होती ती म्हणजे १ जानेवारी रोजी, मात्र आता वर्षातून चारवेळा मतदान नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. याचा फायदा चंद्रपूर शहरातील नवमतदारांना होणार आहे. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता येत होती. परंतु, २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमे-अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ राबविला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी, दिव्यांग व महिला आदींना मतदार नोंदणी करता यावी म्हणून परिसरातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिर राबविले जाणार आहे. ९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अर्ज क्रमांक ६ भरून आगाऊ मतदान नोंदणी करता येणार आहे. जेव्हा १८ वर्षे पूर्ण होईल तेव्हा मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाईल.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. ९ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.
९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने ३ व ४ डिसेंबर या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक याच्या नाव नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेतली जातील. शिवाय मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter portal या संकेतस्थळावर आणि वोटर हेल्पलाईन या मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आले नावे नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा