नागपूर :नागपुरात येत्या १९ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे़. यापूर्वी २०१९ मध्ये नागपुरात अधिवेशन झाले. दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होऊ शकले नाही़. दोन वर्षानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची अर्थातच जोरात तयारी सुरू आहे़. देशाचे हृदयस्थान असलेले नागपूर राज्याची उपराजधानी आहे. नागपूर करारानुसार किमान तीन आठवड्याचे अधिवेशन नागपुरात अपेक्षित आहे. किंबहुना आर्थिक, भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी, विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी खरेतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी नागपूर करार केला मात्र तो गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता तो पाळला गेला नाही हे वास्तव आहे. यावर्षी देखील 19 ते 30 डिसेंबर असा या अधिवेशनाचा कालावधी असला तरी प्रत्यक्षात 10 दिवसांचेच कामकाज होणार आहे.यातही विदर्भाचे किती प्रश्न सुटतात इतकेच नव्हेतर चर्चिले जातात हे येणारा काळच सांगणार आहे. मोठ्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंनत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली नवे सरकार राज्यात आल्याने नागपुरातील विधानभवन परिसरात कामे जोरात आहेत.
समोरील उद्यान, हिरवळ, झाडे सजली आहेत. विधानसभा सभागृहातील खुर्च्या, माईक सारेकाही चकाचक झाले आहे. एकंदरीत नवे सरकार नव्या आव्हानांसाठी तयार होत असतानाच विधानभवन परिसर, आमदार निवास सगळीकडे नवा लूक देण्याचा प्रयत्न चालला आहे. समोर शामियाना टाकण्यात आला आहे. विधिमंडळ सचिवालयाचे कर्मचारी येण्यास काहीसा उशीर असला तरी दोन वर्षे अधिवेशनच न झाल्याने नव्या सरकारकडून साहजिकच खर्च जोरात असल्याचे चित्र दिसले. सुमारे 98 कोटी रुपयांचा खर्च या अधिवेशनाशी संबधित विविध कामांवर अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.