मुंबई : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनामा तयारही केला व तो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला असून आता जयंत पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाणार (Sharad Pawar to decide on Resignation of Jitendra Awhad ) आहेत. आव्हाडांच्या राजीनाम्यावर शरद पवारच निर्णय देतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ठाण्याच्या पोलिसांनी कोणत्या गाईडलाईन्स तपासून जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला? पोलिसांनी अशा पद्धतीने वागावे, हे अमान्य आहे असे जयंत पाटील म्हणाले. पोलिस यंत्रणा अशा पद्धतीने वागणार असेल तर येत्या काळात त्यांना आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांच्या समर्थनात तसेच पक्षाची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आव्हाडांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. आव्हाडांना ठाण्याच्या जनतेचा मोठा पाठिंबा आणि सहानुभूती मिळत आहे. त्यामुळे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
आव्हाडांची कृती विनयभंगाच्या कुठल्या व्याख्येत बसते? मुख्यमंत्र्यांदेखल हे सगळs घडले आहे. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. आव्हाडांनी व्यथित होऊन राजीनाम्याचा निर्णय घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनामा दिलाय. तो राजीनामा माझ्याकडे मी घेतलाय. याविषयी पवारांसाहेबांशी मी चर्चा केली, मी शरद पवार यांच्याशी बोललोय, आम्ही आव्हाडांची समजूत काढतोय, असे जयंत पाटील यांनी सांगितले.