नवी दिल्ली : केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, अशा वल्गना दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केल्या (Arvind Kejriwal Statement) आहेत. सध्या तिहार कारागृहात असलेले आम आदमी पार्टीच्या सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रश्नावर केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. माझ्याकडे एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, निम्मे भाजप तुरुंगात जाईल. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहेत. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकले नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीष सिसोदिया यांनी दारू घोटाळा केला, 10 कोटी खाल्ल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतके छापे टाकूनही काही सापडले नाही, मग 10 कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.
राजधानी दिल्लीत सध्या एमसीडी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले. पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. हे लोक भरपूर पैसे खातात, असे ते म्हणाले.
तिहार तुरुंगातून व्हायरल झालेल्या दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या व्हिडीओवर केजरीवाल म्हणाले की,जैन यांना मिळत असलेल्या सुविधा कारागृह नियमावलीनुसारच आहेत. यासंदर्भात न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. अमित शहा 2010 मध्ये तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यासाठी तिथे डिलक्स जेल बांधण्यात आले होते. कारागृहात त्यांचे जेवण बाहेरून येत होते. ते डिलक्स सुविधा घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकजण घेत असावा असे त्यांना वाटते, असेही ते म्हणाले.