काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींची तुलना केली रावणाशी!, भाजपचा आक्रमक पवित्रा

0

नवी दिल्लीः गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्धल केलेले विधान वादाचा विषय ठरले असून भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे (Congress President Kharge`s Statement Against PM Modi). अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे एका सभेला संबोधित करताना खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली. “मोदी १०० डोकी असलेले रावण आहेत का?” असा सवाल खर्गे यांनी जाहीरसभेत बोलताना उपस्थित केला. खर्गे यांच्या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजपने हा फक्त मोदी यांचाच नव्हे, तर प्रत्येक गुजराती नागरिकाचा अपमान आहे, असल्याचा पलटवार केला आहे.


काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीरसभेत बोलताना पंतप्रधान मोदी व भाजपवर टीका केली. मात्र, ही टीका करताना त्यांची जीभ घसरली. “भाजपा सगळीकडे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करते. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकामध्ये मोदींच्या प्रतिमेचा वापर केला जातो. आम्ही तुमचा चेहरा कितीवेळा पाहावा. मोदी १०० डोकी असलेले रावण आहेत का?” असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला. खर्गेच्या या विधानामुळे संतापलेल्या भाजपने खर्गे यांच्यावर पलटवार केला. गुजरातचे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरलेले हे शब्द योग्य नसून ते अत्यंत निषेधार्ह आहेत. यातून काँग्रेसची मानसिकता दिसते. हा फक्त मोदी यांचाच नव्हे, तर प्रत्येक गुजराती नागरिकाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा