कुख्यात डॉन गवळीला मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मंजूर, पोलिस सुरक्षेविनाच जाता येणार

0

नागपूरः नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला


कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचे लग्न असून त्यासाठी त्याने पॅरोलची मागणी केली होती (Don Arun Gawli on Parole ). त्यामुळे चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. त्याला पोलिसांच्या सुरक्षेशिवाय मुंबईला जाता येईल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. पोलिसांच्या संरक्षणासह गवळीने मुंबईला जावे, अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र याचा खर्चही गवळीला करावा, लागेल अशीही अट होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितल्यावर पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.


गवळीला जन्मठेपेची शिक्षा


शिवसेनेचे घाटकोपरमधील तत्कालीन नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना 2 मार्च 2007 रोजी घडली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. मागील अनेक वर्षांपासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. मुलाचे लग्न असल्याने पॅरोल मिळावा म्हणून कारागृह प्रशासनाकडे त्याने अर्ज केला होता. प्रशासनाने चार दिवसांचा पॅरोल मंजूर करीत पोलिस फौजफाट्यासह नियोजित स्थळी जावे, अशी अट घातली. या विरोधात गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करीत विनासुरक्षा आठ दिवसांचा पॅरोल मिळावा, म्हणून न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. न्यायालयाने सर्व मुद्दे लक्षात घेऊन १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर चार दिवसांचा पॅरोल मंजूर केला.

*नागपुरी गोळाभात रेसिपी | Nagpur Special Gola Bhat Recipe | Episode 33 | Shankhnaad News*