केजरीवाल यांच्या मंत्र्याला कारागृहात मसाज देणारा व्यक्ती बलात्काराचा आरोपी असल्याचे निष्पन्न

0

नवी दिल्लीः मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये दिल्लीच्या तिहार कारागृहात असलेले आम आदमी पार्टीचे नेते व केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (VIP Treatment for Delhi Government Minister Satyendra Jain in Tihar Jail) हे कारागृहात मसाज घेत असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला आहे. त्यावरून जोरदार वाद सुरु असताना आता या प्रकरणात आणखी काही माहिती पुढे आली आहे. त्यांना मसाज देणारा हा व्यक्ती बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आम आदमी पार्टीने जैन हे मसाज घेत नसून फिजिओथेरपी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांनी ती फिजिओथेरपी नसून मसाजच होता असा निर्वाळा दिला आहे. आणि आता मसाज देणारा इसम हा फिजिओथेरपिस्ट नसून बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
आम आदमी पार्टीचे नेेते व दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन ३० मे पासून कारागृहात आहेत. ते तिहार कारागृहाच्या सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. हे प्रकरण उघड झाल्यावर कारागृह अधीक्षकांसह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीचे ठिकाण बदलण्यात आले. भाजपने यावरून आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली व मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या स्पष्टीकरणाची मागणी केली होती. दरम्यान, आम आदमी पार्टीने तो मसाज नसून फिजिओथेरपी असल्याचा दावा केला होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टारांनी ती फिजिओथेरपी नसून मसाजच होता, असा निर्वाळा दिल्याने आम आदमी पार्टीच्या केजरीवाल सरकावर तोंडघशी पडण्याची पाळी आली. आता चौकशीअंती मसाज देणारी व्यक्ती हा बलात्काराचा आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने केजरीवाल सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.