गंभीर घटना टळली, पाचपावलीत

0


पिस्तूल, माऊझर, काडतुसे जप्त

नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठक्करग्राम परिसरात एका कुख्यात गुं डाच्या घरातून एक पिस्तूल, माऊजर आणि ८ जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे यामुळे गंभीर घटना टळली. याप्रकरणी दोघांना पाचपावली पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शशांक सुनील समुद्रे (वय २३, रा. पाचपावली ठक्करग्राम) आणि अभय अजय हजारे (वय २२, रा. बाळाभाऊपेठ) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ठक्करग्राम परिसरात राहणारा कुख्यात गुंड शशांक याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच सापळा रचून या आरोपींच्या घरावर धाड टाकली. घराच्या झडतीमध्ये एक पिस्तूल, ८ जिवंत काडतूस, सात तलवारी, एक कोयता आणि दोन चायना मेड चाकू सापडले.पोलिसांनी पिस्तूल नेमके कुठून आणले, याबाबत जाब विचारला असता, त्याने अभय हजारेकडून ते पिस्तुल दहा दिवसांपूर्वीच खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी बाळाभाऊपेठ येथील अभय हजारेचा शोध घेतला. त्याच्या दुचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये एक माऊजर आढळून आले. यावेळी अभयने पिस्तूल आणि माऊजरची खरेदी विलास कटारे (रा. कांजीहाऊस) याच्याकडून केल्याचे सांगितले. विलास कटारे अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या शस्त्राच्या साहाय्याने दोघेही शहरात मोठ्या कारवाईला पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करीत, त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे, गुन्हे पोलिस निरीक्षक रवि नागोसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत थारकर, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, रहेमत शेख, हवालदार विजय यादव, शिपाई अमित सातपुते, प्रकाश राजपल्लीवार आदींनी केली.