गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत राडा
तुफान घोषणाबाजी करत अंगावर फेकली काळी पावडर

0


सोलापूर. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांची आज सोलापूरमध्ये (Solapur ) पत्रकार परिषद सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी शिरकाव करीत त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकत राडा (throwing black powder on his body) केला. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशा घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. सोमनाथ राऊत असे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सदावर्तेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशा घोषणा देत त्यांनी सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली. गुणरत्न सदावर्ते सीमा प्रश्नावर बोलत असतानाच त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तिने त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी या व्यक्तिला पकडले. मात्र, त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या अन्य एका व्यक्तीने आपल्या खिशातून पावडर काढून सदावर्तेंच्या अंगावर फेकली. तसेच काळे कापड दाखवत घोषणाबाजी केली.
राडा करणारे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड संघटनेचे आहेत. त्यांनी गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करत असल्याचा आरोप केला. तसेच सदावर्तेंच्या वेगळ्या राज्यांच्या मागण्यांचा निषेध नोंदवला. सदावर्तेंनी मराठा आरक्षणालाही विरोध केल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंचा जाहीर निषेध अशीही घोषणाबाजी यावेळी झाली.
पत्रकार परिषदेतील राड्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी या घटनेमागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचा अंगुलीनिर्देश केला. आज भारतीय संविधान दिन आहे. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, संजय राऊत, बिळातले तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिलावळींना माझ्या संवाद यात्रेने सळो की पळो केले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचे ते म्हणाले.


संभाजी ब्रिगेडची भूमिका


संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सोमनाथ राऊत म्हणाले, आज भारतीय संविधान दिवस आहे. गुणरत्न सदावर्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहु महाराज आणि सर्व महापुरुषांच्या महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यामुळे सदावर्तेंना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही हीच संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. आम्ही सदावर्तेंच्या अंगावर काळी शाई फेकली आणि काळे कापड दाखवून निषेध केला आहे. ते महाराष्ट्राकडे अशाच वाकडे नजरेने पाहत असतील त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे सदावर्ते बोलत नसून ते भाजपाचे पिल्लू आहे. भाजपाने महाराष्ट्र तोडायचा ठरवले आहे. आम्ही हे होऊ देणार नाही. महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड जळवळ जीवंत आहे हे आम्ही भाजपाचे पिल्लू सदावर्तेंना सांगू इच्छितो, असे सोमनाथ राऊत म्हणाले.