गोसेखुर्दसाठी योगदान देणाऱ्या अनेकांची नावे गहाळ

0

मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या फलकावर मुख्य अभियंत्यांच्या मर्जीतील नावे

नागपूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( EKNATH SHINDE ) यांच्या भंडारा ( BHNDARA ) जिल्हा दौऱ्यादरम्यान ( GOSEKHURD DHM ) गोसेखुर्द धरणाजवळ अनावरण झालेल्या फलकावरील अभियंत्यांची निवडक नावे हा आता वादाचा विषय होऊ लागला असून, फलकावर लावण्यासाठी ही निवडक नावे निवडणाऱ्या अधिकाऱ्यांनी, विशेषतः मुख्य अभियंत्यांनी पार पाडलेली भूमिका संशयास्पद, एककल्ली आणि वादग्रस्तही ठरते आहे.झाले असे की, राज्याचे मुख्यमंत्री येणार आणि ( Gosekhurd Irrigation Project ) गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला भेट देणार असा कार्यक्रम ठरताच या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रेय लाटण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला. एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्यांचे योगदान लाभले, अशा अधिकाऱ्यांची नावे त्या प्रकल्पाच्या परिसरात दर्शनी भागात लावला जावा, या कुणीतरी, कधीतरी व्यक्त केलेल्या इच्छेचेही त्यांना‌ अचानक स्मरण झाले.

मुख्यमंत्री येताहेत म्हटल्यावर फलकाचे उद्घाटन तर त्यांच्याच हस्ते व्हायला हवे. त्याने फलकाची किंमतही वाढेल आणि महत्वही. साहेबांच्या मनात येताच यंत्रणा लागली कामाला. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी संचालक अशा गटवारीतील चार-पाच , चार-पाच नावे निवडून मुख्य अभियंत्यांनी काही फलक घाईघाईने तयार करून घेतले. काळ्या चकचकीत दगडांवर कोरलेल्या या निवडक नावांच्या फलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रीतसर उद्घाटनही झाले. मंजुरीनंतर तब्बल चाळीस वर्षांचा प्रवास असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वास भरीव योगदान देणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांच्या यादीत ज्यांची नावे आहेत त्यांनी आनंदी होणे स्वाभाविकच होते.

पण, साधनसामग्री, सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, वाहने आदींच्या अभावाच्या त्या काळातही प्रचंड मेहनत केलेल्या, योगदान दिलेल्या ज्या विद्यमान व माजी अधिकाऱ्यांची नावे या यादीत नव्हती, त्यांची बोटे आश्चर्याने तोंडांत गेली. ते लोक संतप्त झाले. प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. ज्यांच्या पुढाकाराने हे फलक तयार झाले आणि ज्यांनी फलकावरील नावांची निवड केली, ते मुख्य अभियंता आणि त्यांच्या सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एव्हाना प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली असून, या अधिकाऱ्यांविरुद्ध प्रचंड चीड आणि संताप व्यक्त होऊ लागला आहे.

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा इतिहासही लांबलचक, रटाळ आणि रखडलेला राहिला आहे. सदर प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर 1983 ते 1988 या पाच वर्षांच्या काळात सिंचन विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी पायपीट करून, जंगल पालथे घालून प्रकल्पासाठी सर्वैक्षण केले त्यांचे योगदान या फलकाच्या निर्मात्यांनी कवडीमोल ठरवले आहे. या काळात किमान अठरा कार्यकारी संचालक, 35 अधीक्षक अभियंता, पन्नासहून अधिक कार्यकारी अभियंता कार्यरत होते. पण विद्यमान मुख्य अभियंता आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी यातील बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना गोसेखुर्दच्या पूर्णत्वाचे श्रेय बहाल केले आहे. खरेतर अभियंत्यांशिवाय इतरही लोकांनी या सिंचन प्रकल्पाषाठी रक्त आटवले आहे. ज्या राजीव टेकडीवर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते, त्या सोहळ्याच्या आयोजनात योगदान‌ देणारे कित्येक लोक आहेत. सर्वेक्षण पासून तर धरण, पुनर्वसन, कालवा, पाईपलाईन, स्टोअर्स अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही खारीचा वाटा उचलला आहेच. त्यांचा तर कुठे उल्लेखही नाही, योगदान देणाऱ्यांच्या यादीत.

त्यांची नावे का नाहीत ?

आता या प्रकरणात प्रश्न असा विचारला जातोय, की जी नावे मुख्य अभियंत्यांनी या फलकावर कोरण्यासाठी निवडली, नेमक्या त्याच नावांचे स्मरण त्यांना कसे झाले? आणि ज्या नावांचा त्यांना व्यवस्थितपणे विसर पडला, ती सारी नावे त्यांच्या नावडीची होती का? कुठल्या निकषांवर काही नावे निवडली गेली, आणि कुठल्या कारणांसाठी काही नावे जाणिवपूर्वक टाळली गेली?
मुळात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण व्हायचे असेल तर, अशा फलकांवरील मजकुराच्या मंजुरीची एक प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर व्हायला हवी होती. प्राप्त माहितीनुसार, सिंचन विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी त्या प्रक्रियेला लाथ मारून त्यांच्या आवडीची तेवढी नावे या फलकासाठी निवडून इतरांना यादीतून बाद केल्याचा आरोप आता होऊ लागला. अनावरण करून मुख्यमंत्री मुंबईला रवाना होताच, अनावरण झालेल्या फलकावरील नावांची चर्चा रंगू लागली आहे. ही चर्चा पुढील काळात कसकसे रंगरूप घेते, ते बघणे महत्वाचे ठरणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा