मुंबई: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) संकेतस्थळावर समस्या येत असल्याने संभाव्य उमेदवारांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची सुद्धा परवानगी दिली आहे. उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र 2 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान (State Election Commissioner ) यानी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आयोगाच्या सुरुवातीच्या सूचनेनुुसार, 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करण्यात आली असून उमेदवारी अर्जात पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.
अर्ज दाखल करण्यात अडचणी
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्र जागून काढावी लागत असल्याच्या तक्रारी होत्या. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी उद्याचा (2 डिसेंबर) शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.