नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाणाऱ्या लाखो अनुयायांसाठी अतिरिक्त गाड्या सोडा, मुंबईच्या सर्व गाड्या नियमित सुरू ठेवा अशी मागणी बसपाने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. इंदू मिलच्या जागेवरील रखडलेल्या डॉ. आंबेडकर स्मारकाच्या बांधकामाचे बिंग फुटू नये या भीतीपोटी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेल मंत्रालयाने 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या 22 गाड्या रद्द केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वात मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक पी एस खैरकर यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मुंबईचे महाप्रबंधक (जी एम) अनिल कुमार लाहोटी यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
बसपा ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर च्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या व 6 ते 9 डिसेंबरला मुंबईवरून परतणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या जैसे थे सुरू ठेवाव्यात. मागील 2 वर्षापासून कोविडच्या भीतीपोटी शासनाने चैत्यभूमी वर जाण्यास बंदी घातली होती. त्यामुळे यावर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतो याकडेही लक्ष वेधण्यात आले. अत्यावश्यक असल्यास रिमॉडेलिंग किंवा नॉन इंटरलॉकिंग चे काम 10 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान करावे अशी सूचना सुद्धा बसपाने केली.
यावेळी मध्य नागपूर विधानसभा बसपाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी शहराध्यक्ष महेश सहारे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, जिल्हा सचिव ताराचंद गोडबोले, लक्ष्मण वाळके, पश्चिमचे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, उत्तर नागपूरचे माजी प्रभारी गौतम गेडाम, विद्यार्थी नेते अंकित थुल, खापरखेडाचे लीलाधर मेश्राम आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.