जिल्हा परिषदेचा 700 कोटींचा निधी रोखला,काँग्रेसचे आंदोलन

0

माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक यांचे धरणे

जिल्हा परिषदेचा 700 कोटींचा निधी रोखला,काँग्रेसचे आंदोलन – माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक यांचे धरणे

नागपूर : शिंदे- फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा परिषदेच्या ७०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री आणि सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानासमोर सोमवारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.


या आंदोलनात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप केला गेला. राज्यात ज्या पालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपचे सरकार नव्हे तर कॉंग्रेस किंवा इतर पक्षांचे आघाडी सरकार आहे, तेथे राज्य सरकार जनतेची गळचेपी करीत आहे. लोकशाहीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी उचलले हे पाऊल असून लोकांच्या करातून आलेला पैसा आज त्यांच्याच कामी पडत नाही. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.


नियमांच्या विरोधात कुणी कुठलेही काम करू शकत नाही. मग जिल्हा परिषदेच्या कामांत अनियमितता कशी, हे कुणीही दाखवावे, असे आवाहन लोंढे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतच नव्हे तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतींमध्येही पराभूत झाल्याने त्याचा बदला हे मतदारांकडून, सामान्य जनतेकडून घेत आहेत. आम्ही या कृतीचा निषेध करतो, असेही काँग्रेसने म्हटले आहे. आमदार सुनील केदार, माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. जनतेला न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील, असेही यावेळी माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले.

यावेळी आमदार अभिजीत वंजारी, जिप अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, सुरेश भोयर,शकुर नागाणी, सौ रश्मी बर्वे, कुंदाताई राऊत, अवंतिका लेकुरवाळे, राजकुमारजी कुसुंबे, मिलिंदजी सुटे, प्रवीण जोध, सुमित्राताई कुंभारे, उज्वलाताई बोढारे, नेमावली माटे, वंदनाताई बालपांडे, सुनीताताई ठाकरे, सौ. नीलिमाताई उईके, शालिनीताई देशमुख, ममताताई धोपटे, वृंदाताई नागपुरे, पिंकीताई कौरती, माधुरीताई गेडाम, संजयजी जगताप, प्रकाश वसू, अरुण हटवार, दिनेश बंग, रश्मीताई कोटगुले, महेंद्रजी डोंगरे आदी काँग्रेस, जिप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा