ज्ञानेश्वरी’ हे गीतेवरील सर्वांगसुंदर भाष्य आहे – प. पू. श्री. संजय गोडबोले गुरुजी

0
  • श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त प्रवचनमालेचे आयोजन   

नागपूर, ३० नोव्हेंबर : ज्ञानेश्वरी हे गीतेवरील सर्वांगसुंदर भाष्य आहे, असे भाष्य प. पू. संजय गोडबोले गुरुजींनी केले. प. पू. समर्थ सद्गुरू श्री. विष्णुदासस्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्राच्या वतीने श्रीदत्त जयंती सोहळ्याप्रित्यर्थ श्रीगुरुमंदिर, आरबीआय कॉलनी, जयप्रकाश नगर, खामला येथे ‘पसायदान एक वैश्विक प्रार्थना / चिंतन’ या विषयावर आयोजित प्रवचनमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. 

याप्रसंगी प. पू. श्री. सद्गुरुदास महाराज यांची सार्थ उपस्थिती होती. प्रवचनमालेच्या प्रारंभी संजय देशकर यांनी उपस्थित श्रोत्यांना प. पू. संजय गोडबोले गुरुजी ( संस्थापक संत सेवा संघ, पुणे ) यांचा परिचय करून दिला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात श्रीगुरुपूजेनंतर परमपूजनीय श्री. सद्गुरूदास महाराज यांच्या गुरूवाणीतून उपस्थित भाविक श्रोत्यांनी श्रीगुरुचरित्राचे श्रवण/पारायण केले. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा वाणीप्रसाद असलेल्या श्रीज्ञानगीतेची ( ज्ञानेश्वरी ) पार्श्वभूमी, भूमिका आणि निर्मिती यांवर बुधवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी श्री. गोडबोले गुरुजींनी निरूपण केले. संत ज्ञानेश्वर म्हणजे विश्वाची निर्मिती करणारे चैतन्य आहे. त्यांनी आपल्या आत्मशक्तिने रेड्यातील चैतन्याला सामर्थ्य देऊन त्याच्या मुखी वेद वदवले. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि लिंग देह यांचे मिश्रण म्हणजे मनुष्य देह होय. भौतिकतेतून लक्ष काढून आत्मसत्यामध्ये रमविणारे संत असतात. निधी निवास ( नेवासे ) या गावी ज्ञानोबा माउलींनी गुरुबंधू श्री. निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ‘ज्ञानेश्वरी’चे निरूपण केले. आचार्योपासना  म्हणजे काय, यावर ज्ञानोबा माउलींनी ९८ ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरीतील ज्ञान मधुर, सुरेख, गोड आहे. यात कर्म आहे पण कर्मकांड नाही. ज्ञानेश्वरीतील भक्ती डोळस, स्वच्छ, सोज्वळ, उर्जस्वल, विवेकी भक्ती आहे. ज्ञानेश्वरीत योग आहे परंतु सिद्धिंचा बुजबुजाट नाही, असे वर्णन श्री. गोडबोले गुरुजींनी केले. 

तत्पूर्वी ‘भारता’ची व्याख्या करताना ते म्हणाले की, भक्ती, ज्ञान यांच्या अथांग सागरात डुंबून जाणे म्हणजे भारत, विचाराने श्रीमंत असलेल्या लोकांचा संघ म्हणजे भारत होय. त्यातही संतांच्या आणि शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीत जन्म मिळणे दुर्मिळ आहे, असेही त्यांनी सांगितले. 

वतर्मान काळातील मानवी जीवन आणि भौतिकतेवर भाष्य करताना ते म्हणाले की, मर्त्य देहाचे वय म्हणजे आपले वय नव्हे, हे समजून घ्यायला हवे. आज आपण हसणे विसरलोय, आपल्या कपाळावर सतत आठ्या आणि उद्वेग असतो, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. मानवाच्या चार प्रकारांवर भाष्य करताना गुरुजींनी सांगितले की, दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणारा मनुष्य तमोगुणी ‘असुर मानव’ होय. दुसरा प्रकार म्हणजे ‘पशू मानव’ होय. यात आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार वृत्तींमध्ये जगणारा मनुष्य येतो. तर ‘मनुष्य मानव’ म्हणजे सरळमार्गी व्यक्ती होय. तसेच ‘देव माणूस’ म्हणजे जो परोपकारी, दुःखीतांची मदत करतो, करुणासिंधू असा जो परमात्म्याशी आपला संबंध जोडतो, त्यादृष्टीने प्रवास व प्रयत्न करतो, असे गुरुजींनी सांगितले. 

बहुसंख्येने उपस्थित श्रोत्यांनी श्री. गोडबोले गुरुजींच्या प्रवचनमालेतील प्रथम पुष्पाचा लाभ घेतला. गुरुवारी सकाळच्या सत्रात १० ते १२:३० वाजताचे दरम्यान श्रीगुरुपूजेनंतर परमपूजनीय श्री. सद्गुरूदास महाराज यांच्या गुरूवाणीतून श्रीगुरुचरित्राचे पारायण होईल. तर दुपारी ३:३० ते ५:०० वाजता दरम्यानच्या सत्रात आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या पुष्पात श्री. गोडबोले गुरुजी पसायदानातील तत्वज्ञान, ‘आता विश्वात्मके देवे’ या संकल्पनेवर निरूपण करतील. तसेच सायं सत्रात ह. भ. प. मनोहरबुवा दीक्षित (औरंगाबाद) यांच्या मधुर वाणीत कीर्तन होईल.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा