ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

0

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी निधन (Dr. Nagnath Kottapalle) झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे नागनाथ कोत्तापल्ले यांनी कथा, कविता, दीर्घकथा, कादंबरी, ललित, अनुवाद, समीक्षा अशा विविधांगी प्रकारांतून त्यांनी विपुल साहित्यसेवा केली. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.


महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.१९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले.


फडणवीस यांची श्रद्धांजली


उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी डॉ. कोतापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विद्यापीठांमध्ये मराठी अभ्यास मंडळांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मराठीची केलेली सेवा ही मार्गदर्शक अशीच आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन तसेच इतरही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य सुद्धा अतिशय उल्लेखनीय होते. एक उत्तम मार्गदर्शक, प्रशासक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आपण गमावले आहे, अशा भावनात्यांनी व्यक्त केल्या.