ज्योतिबा फुले पुण्यतिथी

0

ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. त्यांना महात्मा फुले या नावानेही ओळखले जाते. आज (बुधवार) 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंची पुण्यतिथी. महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotirao Phule) यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason या पुस्तकाचा प्रभाव होता.

जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.

महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये वयाच्या १४ व्य वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत.

महात्मा जोतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य

१) अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्रा. मिस फरारकडून प्रेरणा घेऊन ३ ऑगस्ट १९४८ रोजी जोतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत ८ मुली उपस्थित होत्या. महात्मा जोतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून जोतिबांना त्यांच्या पत्नींसोबत गृहत्याग करावा लागला. यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात मुक्काम केला.

२) १८५० – ३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरु केली. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.

३) १९ मे १८५२ रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली.

४) शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (सध्याचे डेक्कन कॉलेज) प्रा. मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून जोतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

५) महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर१८५३ मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. तर १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली.

६) १८८२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.

महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा

१) १८९५ साली फुलेंनी वयाच्या२८ व्या वर्षी पुण्यात ‘तृतीय रत्न’ हे पहिले नाटक लिहिले. हे जोतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते.

२) २८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८७३ मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.

३) १८७७ साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली.

४) विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.

५) ८ मार्च १८६४ रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.

महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा जोतिबा फुले

या ओळींतमधून शिक्षणाशिवाय कष्टकरी, मजूर वर्गाची काय स्थिती होते. शिक्षण ही गोष्ट नसली तर काय होतं याची मांडणी महात्मा फुले यांनी वरील ओळींतून केली आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये शाळा सुरु केल्यानंतर त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. अनेक कारण देत विरोध सुरु होता. महात्मा फुले यांना गोपाळबाबा वलंगकर, राणबा महार. लहुजी साळवे यांनी अस्पृश्य समाजात शिक्षणाबद्दल जागृती करण्यास मदत केली. मुलींना शिकवण्यासाठी ख्रिस्ती शिक्षिका चालणार नव्हती. जोतिबा फुले यांच्यासमोरील ही अडचण सावित्रीबाईंना समजली. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षिका होण्याती तयारी दाखवली. सुरुवातीचे काही दिवस महात्मा फुले यांनी त्यांना घरीच शिकवसं. त्यानंतर पुढे जोतिबा फुले यांचे मित्र केशवराव शिवराम भवाळकर-जोशी आणि यशवंत परांजपे यांच्यावर सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथे मिसेस फरार आणि पुणे येथे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केलं. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या, त्यांच्या सोबतचं फतिमा शेख या पहिल्या मुस्लीम प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या.

महात्मा फुले यांची साहित्य संपदा

स्त्री शिक्षासासोबत अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले यांनी काम केल. महात्मा फुले यांनी विविध ग्रंथांचं लेखन देखील केलं आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादि काव्यरचना, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, हंटर शिक्षण आयोगापुढं सादर केलेल निवेदन, इशारा आणि तृतीयरत्न नाटक या पुस्तकांचं लेखन महात्मा फुले यांनी केलं.

मारेकऱ्यांचं मनपरिवर्तन

शिक्षण प्रसाराबरोबर इतरही सुधारणा कार्ये सुरू महात्मा फुले यांनी केली होती. महात्मा फुले यांच्या कार्याला पुण्यातून त्या काळी विरोध सुरु होता. समाजातील कर्मठ व्यक्तींनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला कडाडून विरोध केला होता. 1856 मध्ये महात्मा फुले यांना जिवे मारण्यासाठी मारेकरी पाठवण्यात आले होते. शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना विद्या मिळाली, ते जागृत झाले, ग्रंथ वाचू लागले तर त्यातील आपल्या लबाड्या उघड होतील. म्हणून जोतिबाचे सुधारणेचे खूळ बंद पाडलेच पाहिजे या विचारानं तत्कालीन समाजातील कर्मठ व्यक्तींनी महात्मा फुले यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले होते.

इ.स. 1856 साल होते.आपले क्रांतिकार्य अधिक सखोल, व्यापक आणि भक्कम कसे करावयाचे, याचा विचार जोतिबा करीत होते. मध्यरात्र उलटून गेली. बाहेर अंधाराचे साम्राज्य होते. घरात समईचा शांत आणि मंद प्रकाश पडला होता. ते प्रकाशकिरणत्या अंधाराला भेदण्याचा प्रयत्न करीत होते. नीरव शांतता होती. तेवढ्यात जोतिबांना कसलीतरी चाहूल लागली. यावेळी कोण झाले असावे. हातामध्ये नंग्या तलवारी घेतलेल्या दोन व्यक्ती त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या. त्यांना पाहून जोतिबांच्या काळजात धस्स झाले. आणि जोतिबा जागेच असल्याचे पाहून ते मारेकरी गांगरून गेले. भेकड सनातन्यांना एखाद्याचा खून करण्याची हिंमत नव्हती. सुपारी देऊन पाठविलेले ते मारेकरी होते. जोतिबांनी अंदाज केला. धाडसाने, प्रेमळपणाने, कारूण्य भरल्या आवाजात त्यांनी विचारले, “तुम्ही कोण? कशासाठी येथे आलात?” “मला मारल्यामुळे तुमचा एवढा फायदा होणार असेल तर मला जरूर ठार मारा… माझे आयुष्यच दीनदलितांसाठी आहे” असं महात्मा फुले म्हणाले. महात्मा फुले यांना मारण्याची सुपारी पुण्यातील काही ब्राह्मणांनी दिल्याचं दोन्ही मारेकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं. जोतिबांचा शांत, सोज्वळ तरीही करारी चेहरा, निर्भयपणा, त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारी करूणा, त्यांच्या बोलण्यातील मधाळपणा, यामुळे ते मारेकरी पश्चात्ताप झाले. जोतिबा फुले यांच्या मनाचा मोठेपणा पाहून ते प्रभावित झाले आणि महात्मा फुलेंच्या कार्यात सहभागी झाले. या मारेकऱ्यांपैकी एक धोंडिराम नामदेव कुंभार याने जोतिबा फुले यांच्याजवळ शिक्षण घेऊन, त्यांच्याच आज्ञेने काशी येथे जाऊन संस्कृत विद्या संपादन केली. पंडितराव हा बहुमानाचा किताब मिळविला. 12 फेब्रुवारी 1884 रोजी सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे शृंगेरी मठाच्या शंकाराचार्यांना आणि ब्रह्मवृंदांना वेदांवरील वादविवादामध्ये पराभूत केले. ‘सत्यशोधक समाजाची मते चांगली आहेत. सर्व समाजाने त्या समाजाचे अनुयायी व्हावे.’ अशी आज्ञा करणारा ताम्रपट; शिक्का आणि सहीसह त्यांनी दिला. पंडित धोंडिराम कुंभार यांनी सत्यशोधक समाजाचा प्रसार खूप धडाडीने केला. त्यांनी अखंड रचनाही केली आहे. दुसरा मारेकरी रोडे हा रामोशी होता. तो जोतिबा सावित्रीबाई यांचा अंगरक्षक बनला. त्याची सून सावित्रीबाई रोडे सत्यशोधक समाजाची अध्यक्षा झाली. सत्यशोधक समाजाचा विचार या कुटुंबाने पुढे दोन-तीन पिढ्यांत निष्ठेने जतन केला. मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन घडून नव्या इतिहास निर्मितीला आणि ऐतिहासिक कार्याला चालना देणारा असा प्रसंग इतिहासात तरी अजोड आहे.

सत्यशोधक समाजाची स्थापना

महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर मोठा हौद बांधलेला होता. त्यांनी अस्पृश्य समजासाठी 1868 मध्ये पाण्याचा हौद खुला केला. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत ही मानवी भावना त्यामागं होती. तळागाळातील कष्टकरी शेतकरी, बलुतेदार आलुतेदार, भटके स्त्री पुरुष यांच्या दु:ख मुक्तीचा ध्यास महात्मा फुले यांनी घेतला होता. वर्णजातिव्यवस्था आणि स्त्री दास्याचा अंत झाल्याशिवाय हा समाज सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही, हे त्यांनी जाणलं होतं. आपल्या कार्यासाठी एक व्यापक संस्था असावी यासाठी महात्मा फुले यांनी 24 नोव्हेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्याचा शोध घेणे, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणे, सत्याचा अनेक बाजू, अनेक पैलू, अनेक शक्यता लक्षात घेणीर संस्था म्हणून सत्यशोधक समाज नाव निवडण्यात आलं. सर्व मनुष्य एकाच ईश्वराची लेकरे आहेत व तो सर्वांचा मायबाप आहे. आईला विनवण्यास किंवा बापाला संतुष्ट करण्यास लेकराला जशी मध्यस्थाची गरज नसते, तसेच भक्तांना ईश्वराची ओळख करुन देण्यासाठी व परस्नन करुन घेण्यासाठी उपाध्याय किंवा धर्मगुरु असल्या मध्यस्थाची जरुरी नाही हे सत्यशोधक समाजाचं तत्वं होतं.

1887 नंतरचा काळ महात्मा फुले यांना आजारांना तोंड द्यावं लागलं. सावित्रीबाई फुले यांनी त्यांची खूप शुश्रषा केली. डॉ. खोले यांनी त्यांच्यावर उपचार केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी देखील महात्मा फुलेंना मदत केली होती. मृत्यूपूर्वी ते दोन महिने आजारीचं होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं. क्रांतीसूर्य जोतिबा फुले आज आपल्यासोबत नसले तरी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याच्या रुपानं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या रुपानं, विचारांच्या रुपानं ते जिवंत आहेत. त्यांचे विचार आणि कार्यक्रम हेच मार्गदर्शक आहेत.