तब्बल 1500 किलो गांजा जप्त, नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

0

नागपूर : शेजारच्या राज्यांमधून नागपूरमार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा पोलिसांच्या एका कारवाईतून स्पष्ट झाली आहे. ओडिशातून नागपूरमार्गे मराठवाड्या्च्या दिशेने जात असलेल्या सुमारे 1500 किलो गांजा जप्त नागपूर पोलिसांना (1500 Kg Ganja Seized in Nagpur District) यश आले आहे. अंमली पदार्थाच्या बाजारात या गांजाची किंमत एक कोटी रुपयांच्या वर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेला गांजा हा उच्च दर्जाचा असून त्याचा पुरवठा बीडमध्ये करण्यात येणार होता, असा पोलिसांचा दावा आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात ही कारवाई केली.
या प्रकरणातील पुरवठादार, वाहतूकदार, माल स्वीकारणारे तसेच ग्राहक या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एक टिम स्थापन करण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिस आयुक्तांनी दिली. एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप येत असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. ट्रकमध्ये तब्बल पन्नास पोत्यांमध्ये हा गांजा आढळून आला. पोलिसांनी विशेष प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने या ट्रकची तपासणी केल्यावर त्यात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे पंधराशे किलो गांजा सापडला आहे. हा गांजा बीडमध्ये नेण्यात येणार होता, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बीड पोलिसांना सतर्क केल्यावर तेथे दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी तस्करांकडून रेल्वे मार्गाचाही वापर करण्यात येत होता. मात्र रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने रस्ते मार्गाचा वापर आता तस्करांनी सुरु केला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपूर पोलिसांनी शहरात अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई सुरु केली होती. यामध्ये अवघ्या काही तासांतच पोलिसांनी शंभरपेक्षा जास्त जणांवर कारवाई करुन 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.