कोश्यारींच्या विधानावर मुनगंटीवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे दिले उदाहरण
मुंबई. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (BJP National Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून टीकेचे टोचरे बाण सोडले जात आसतानाच भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या विषयावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दाखला दिला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? याचं उत्तर आपल्याला शोधावे लागेल. शरद पवार यांना जानता राजा म्हणायचे. आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी उद्धव टाकरे गट तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून केली जात आहे. काँग्रेसने तर महाराष्ट्राची माफी न मागितल्यास तुम्हाला फिरू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून संताप व्यक्त केला जात असताना, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे.
अजित पवारांनी घेतला समाचार
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील,असे अजित पवार म्हणाले. तसेच, राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.