‘त्याला त्यापेक्षाही भयंकर शिक्षा व्हायला हवी’, श्रद्धाच्या वडीलांची संतप्त भावना

0

नवी दिल्लीः श्रद्धा वालकरच्या या तरुणीच्या भयावह हत्याकांडाने सारा देश हादरून गेलाय. आपल्या मुलीची अत्यंत निर्दयतेने हत्या करणाऱ्या आफताबला त्यापेक्षाही भयंकर शिक्षा व्हायला हवी. त्याला फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी तिचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. आफताबच्या सांगण्यावर आपला अद्यापही विश्वास नसून जर ते खरे असेल तर त्याला फासावर लटकवले पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या मुलीशी आपले २०२१ मध्ये शेवटचे बोलणे झाले होते, असे त्यांनी सांगितले (Shraddha Walker Murder case). आफताबशी ओळख झाल्यानंतर श्रद्धा बदलली होती, असे तिचे वडील सांगतात. तिच्या राहणीमानात मोठा बदल झाला होता. मला माझी मुलगी चांगल्या स्थितीत आहे असेच वाटत होते. जुलै महिन्यात तिचे मित्र माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतरच मला तिच्याशी संपर्क होत नसल्याचे कळले, असे त्यांनी सांगितले.


श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवनवी माहिती पुढे येत आहे. अफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. त्याचवेळी त्याचे घरात दुसऱ्या मुलीशीही संबंध होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. ज्या डेटिंग अॅपवरुन श्रद्धा आणि अफताबची ओळख झाली होती, त्याच डेटिंग अॅपवरुन त्याची अन्य एका मुलीसोबत ओळख झाली होती. ती दुसरी मुलगी पेशाने सायकोलॉजिस्ट होती. श्रद्धाच्या खूनानंतर तो त्या मुलीला राहत्या फ्लॅटवरच घेऊन यायचा, असे पोलिसांनी सांगितले. अशावेळी घरात फ्रिजमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची दुर्गंधी बाहेर येऊ नये यासाठी त्याने अगरबत्ती आणि रूम फ्रेशनर्सचा मोठा साठाच केला होता. तो रोज मृतदेहाचे तुकडे असलेली एक-एक पिशवी घेऊन मध्यरात्री घराबाहेर पडत असे आणि ते जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता. काही दिवसांत त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

श्रद्धाच्या नावाने संभाषण

श्रद्धाची हत्या केली, याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून अनेक आठवडे आफताब श्रद्धाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मित्र-मैत्रिणींशी संभाषण करीत राहिला. त्यामुळे कुणालाही लवकर संशय आला नाही.

धोक्याची जाणीव

आपल्या जीवाला धोका असल्याची जाणीव श्रद्धाला पूर्वीच झाली होती. तिने याबद्दल आपल्या एका मित्राला मेसेज केल्याचेही आढळून आले आहे. श्रद्धाची सप्टेंबरपासून कोणालाही काहीही माहिती नव्हती. मात्र श्रद्धाने आपल्याला व्हॉटसपवरुन आपल्या अडचणी सांगितल्याची माहिती त्या मित्राने पोलिसांना दिली. माझी या घरातून सुटका कर, अशी विनंती तिने मला केली होती. आज रात्रीच माझ्या जीवाला धोका असल्याचे तिने मित्राला सांगितले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

नागपुरी गोळाभात रेसिपी | Nagpur Special Gola Bhat Recipe | Episode 33 | Shankhnaad News