थायलंडची बुद्धमूर्ती दीक्षाभूमीत

0

-‘बुद्धम् शरणं गच्छामि’च्या जयघोषात मिरवणूक


नागपूर : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची ध्यानस्थ मुद्रेत अष्टधातूची थायलंड येथून आलेली बुद्धमूर्ती ‘बुद्धम् शरणं गच्छामि’च्या स्वरात भव्य मिरवणूकीद्वारे पंचशील नगर ते दीक्षाभूमीपर्यंत पुष्पवृष्टीत पोहचली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते ही साडेसात फूट उंचीची बुद्धमूर्ती बुद्धवनच्या (काटोल रोड) पदाधिकार्‍यांना भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच ससाई यांच्या हस्ते दुसरी साडेनऊ फूट उंच आणि चारशे किलो वजनाची अष्टधातूची ध्यानस्थ असलेली बुद्धप्रतिमेची दीक्षाभूमी येथील स्तुपाच्या आत स्थापना करण्यात आली.


दीक्षाभूमीच्या स्तुपात भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. थायलंड बुद्धिस्ट असोसिएशनचे महासचिव डॉ. महाकाई यांच्या नेतृत्वात 30 भिक्खू आणि थायलंडचे दानदाते यावेळी उपस्थित होते. थायलंडमध्ये बुद्धमूर्ती दान देणे हे सर्वात चांगले कर्म मानले जाते. त्यानुसार तेथील दानदात्यांनी दोन बुद्धीमूर्ती दान दिल्या. विशेष म्हणजे या प्रतिमेसारखी दुसरी मूर्ती तयार होऊ नये म्हणून बुद्धमूर्तीचा साचा नष्ट करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत ससाई तर प्रमुख अतिथी म्हणून दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते. यावेळी स्मारक समितीचे सदस्य डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण स्मारक समितीचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे आणि युवा भीम मैत्री संघाचे अध्यक्ष दीपक वासे, विक्रांत गजभिये, बुद्धिमान सुखदेवे, विशाल जनबंधू, विनोद सुदामे, हितेश उके, ए. भिवगडे यांच्यासह समता सैनिक दल, भिक्खू संघ आणि पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले. आता थायलंडच्या एकूण चार मुर्ती दीक्षाभूमीत आहेत. असे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले. विशेष म्हणजे स्मारक समितीचे सचिव दिवंगत सदानंद फुलझेले यांना थायलंडच्या मुर्ती विषयी विशेष आकर्षण होते. असेही ते म्हणाले.