नागपूर : नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष शिबिराला सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी या शिबिरात 340 जणांची नोंदणी झाली. गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या परिसरात आयोजित या शिबिराचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, विशेष अतिथि म्हणून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मनपा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मनपा समाज विकास विभाग अधिकारी डॉ. रंजना लाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधील दिव्यांगांना प्रमाणपत्र नोंदणीसाठी ६ डिसेंबरपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात हे शिबिर असणार आहे. शिबिर परिसरात स्वीकार संस्था, संकल्प संस्था, समदृष्टी, संजय गांधी निराधार योजना, मतदार नोंदणी, बौद्धिक दिव्यांग, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास मंडळ, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, मनपा समाज विकास विभाग यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी भेट देउन माहिती घेतली. यावेळी त्यांनी दिव्यांगांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता निश्चिती करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अभिजित राउत यांनी सांगितले.
३ डिसेंबर रोजी विशेष शिबिर राबविण्यात येत आहे.
शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींकरिता स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष मोहिम कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व तपासणी व निदान करून त्यांना स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे.
नागपूर शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी नागपूर शहरातील मनपाच्या दहाही झोननिहाय शिबिर वेळापत्रकानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय तज्ञ, डॉक्टर्स आणि व्यावसायिक तज्ञ डॉक्टर्स यांचेद्वारे शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी व निदान करण्यात येईल.
शिबिराद्वारे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक, अभिजीत राऊत आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.