मुंबई: दिशा सालियनचा मृत्यू चौदाव्या माळ्यावरून खाली पडल्याने झाला असून तो अपघाती मृत्यू असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. या मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आणि महिला नेत्यांनी आता माफी मागावी, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on Disha Salian Death Case) यांनी केले आहे. भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेत्याला बदनाम का केले? आता या सगळ्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे, असे ( SANJAY RAUT ) संजय राऊत यांनी म्हटले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
बॉलीवूडमध्ये टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रिजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा याचा काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची मागणी केली होती. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचे राहुल कनालचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासले पाहिजे, असा संशय व्यक्त करताना यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल, त्यासाठी तपास झाला पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली होती. राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता, असेही नितेश यांनी म्हटले होते. त्यामुळे आता आरोप करणाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.