यवतमाळ. राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसची देखभाल- दुरुस्तीच होत नसल्याची जुनीच तक्रार आहे. बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. एस.टी. महामंडळाच्या बसेस भंगारात (Scrap buses ) काढण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. मात्र, तरीही त्याचा वापर होत असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. महामंडळ प्रशासनाकडू धोक्याकडे दुर्लक्ष करीत केवळ कमाईसाठी आहे तशा अवस्थेत बसेस दामटल्या जात आहेत. त्यातून अपघातही घडत आहेत. असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला. यवतमाळ – अमरावती मार्गावर धावत्या ‘शिवशाही’ बसची डिझेल टाकी रस्त्यावर निखळली (diesel tank of ‘Shivshahi’ bus spilled on the road). ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. बडनेरा (अमरावती) आगाराची वातानुकूलित शिवशाही बस (क्र. एमएच ०९/ ईएम २२६०) ही गुरुवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ आगारातून अमरावतीकडे ५० प्रवासी घेऊन निघाली होती.
बस वेगात असतानाच नेर तालुक्यातील मालखेड गावानजीक धावत्या बसची डिझेल टाकी अचानक तुटली. . भरधाव शिवशाहीची डिझेल टँक तुटून रस्त्यावर घरंगळू लागली. या आवाजामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली तेव्हा टाकी निखळल्याचे आढळले. ही बाब लक्षात आली नसती तर चालत्या बसमध्ये डिझेल टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर बस चालक, वाहकाने प्रवाशांना बसखाली उतरवून अन्य बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था केली. या घटनेने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती.
डिझेल टाकी निखळलेल्या बसमधील प्रवाशांना मागेहून आलेल्या दुसऱ्या शिवशाही बसने अमरावतीला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र त्या बसमध्येही (क्र. एमएच ०६/बीडब्ल्यू ३५७४) तांत्रिक बिघाड असल्याने ती सुद्धा अमरावतीपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसल्याची माहिती चालक, वाहकाने प्रवाशांना दिली. त्यामुळे प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला.
बस पेटण्याच्या घटना वारंवार घडत आहे. पुणे येथे यवतमाळातील शिवशाहीने पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. खासगी ट्रॅव्हल्सनेही पेट घेतला. त्यात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला तरीही बसेसच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकजे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.