धोनीकडे टी-२० संघाची विशेष जबाबदारी देणार? बीसीसीआयकडून हालचाली

0

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर आता बीसीसीआयने तातडीच्या उपाययोजनांवर विचार सुरु केला आहे. टी-२० चा चांगला अनुभव असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची धुरा सोपविली जाऊ शकते, असे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्याच्या कार्यकाळातच भारतीय क्रिकेट संघाने टी-२० चा विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) धोनीला भारतीय संघाची विशेष जबाबदारी सोपविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. आयपीएलच्या आगामी हंगामानंतर धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीकडे केवळ टी-20 संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यातही त्याला निवडक खेळाडूंसोबत काम करावे लागेल. सध्या भारतीय संघ जास्त प्रमाणात क्रिकेट खेळत आहे. खेळाडू तिन्ही फॉरमेटमध्ये क्रिकेट खेळणे टाळत आहेत. बीसीसीआयला राहुल द्रविडचा भार कमी करायचा आहे. टी-20 क्रिकेटमध्ये धोनीचा अनुभव दांडगा आहे. ज्याचा संघाला फायदा होऊ शकतो, असे बीसीसीआयला वाटते. त्यामुळेच धोनीच्या अनुभवाचा संघासाठी फायदा करून घेण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
धोनीचे असेही विक्रम
एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर 2011 मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला होता. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा