नकारात्मक ट्विट्स काढून टाकणार

0

न्यूयॉर्क : ट्विटरमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू असतानाच एलॉन मस्क यांनी नवे कंटेंट मॉडरेशन धोरण जाहीर केले आहे. त्याचबरोबर काही बंद खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही ट्विटरने घेतला आहे. ट्विटरच्या नव्या धोरणात बोलण्याचे स्वातंत्र्य असेल, पण पोहोचण्याचे नाही, असे ट्विट एलॉन मस्क यांनी केले आहे. नकारात्मक आणि द्वेषयुक्त ट्विट्स काढून टाकले जातील. अशा ट्विट्सच्या जाहिराती ट्विटर चालवणार नाही. जोपर्यंत ट्विट्स विशेषत: शोधले जाणार नाहीत, तोपयर्ंत ते सापडणार नाहीत, असे मस्क यांनी म्हटले आहे. हे नियम केवळ वैयक्तिक ट्विटला लागू असून संपूर्ण खात्याला नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.


अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. त्यांचे खाते पुन्हा सुरू करावे की नाही? यासाठी ट्विटरकडून पोल घेतला जात आहे. कॉमेडियन कॅथी ग्रिफिन आणि पुराणमतवादी समालोचक जॉर्डन पीटरसन यांची ट्विटर खाती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.
दरम्यान, ट्विटरची कार्यालयं तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहेत. ही कार्यालयं २१ नोव्हेंबरला उघडणार आहेत. कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून ट्विटरमधून अनेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. कार्यक्षमरित्या जास्त तास काम न केल्यास नोकरीचा राजीनामा देण्यास कर्मचार्‍यांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.