नका अस्मितेला नख लावू ?

0

पुरुषोत्तम आवारे पाटील

ज्या महाराष्ट्राने आजवर एकापेक्षा एक क्रूर आक्रमकांना माती चारली, याच मातीत गाडले आणि गर्वाने उन्मत्त झालेल्या माना पराभवाने खाली झुकवल्या
त्याच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अलीकडे वारंवार स्वतःहून माती खायला लागले आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी हे महाशय उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक राहिले आहेत त्या विचार धारेतील संभ्रम आणि वैचारिक गोंधळ सत्तेवर
आल्यावर नेमका चव्हाट्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले
आहेत त्यांच्यापेक्षा इतर लोक आता हिरो म्हणून इथे कार्यरत आहेत या आशयाचे अत्यंत वाह्यात आणि खोडसाळ वक्तव्य कोश्यारी यांनी करून मराठी
माणूसच नव्हे तर राज्याच्या १५ कोटी जनतेच्या अस्मितेला नख लावण्याचा
आगाऊपणा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलनाच आजच्या कोणत्याही टिनपाट व्यक्तींशी होऊच शकत नाही हे जर कोश्यारीना माहित नसेल तर त्यांचा चांगलाच क्लास इथला मावळा घेतल्याशिवाय राहणार नाही.
राज्यपाल कोश्यारी यांच्या मुखातून अलीकडे जे बाहेर पडते त्याला गरळ किंवा ओकारी याशिवाय अन्य काही म्हणताच येणार नाही. महात्मा फुल्यांच्या बाबतीत पुण्यात असेच वादग्रस्त विधान त्यांनी करून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता ,आता पुन्हा त्याच मार्गाने जाण्यास ते किती आतुर असतात हे या वक्तव्यावरून दिसून येते. राज्यपाल पदावरील व्यक्तीने सार्वजनिकच नव्हे तर अगदी खासगी कार्यक्रमातही अतिशय विचारपूर्वक विधाने केली पाहिजेत. संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींची
भाषणे म्हणूनच लिखित देण्याची प्रथा आपल्या लोकशाहीत निर्माण झाली आहे. कोश्यारी मात्र त्याकडे कानाडोळा करीत प्रासंगिक भाषणे करण्याच्या मोहात
वाट्टेल ते ठोकून द्यायला लागले आहेत.
मूळचे संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे गडकरी, फडणवीस किंवा मोदीप्रेम
आम्ही समजू शकतो मात्र या प्रेमात त्यांनी कोट्यवधी जनतेच्या दैवताच्या
बाबतीत अकलेचे तारे तोडणे ताबडतोब थांबवले पाहिजे. शिवाजी महाराज यांच्या
बाबत अत्यंत खोडसाळ वक्तव्य करू आता दोन दिवस उलटून गेले आहेत मात्र अजूनही संघ परिवाराकडून त्यावर निषेधाचे दोन शब्द आलेले नाहीत यावरून हीविचारधारा मानणारा वर्ग शिवाजी महाराज यांच्या बाबतीत कसा विचार करतो हे
दिसून येते. ज्या काही भाजप नेत्यांचे वक्तव्य आली आहेत ती संभ्रम निर्माण करणारी आहेत. कोश्यारी याना कदाचित तसे म्हणायचे नसेल या शब्दात भाजपवाले त्यांची बाजू घेत आहेत मात्र एकाही नेत्याने कोश्यारी याना
खडसावून जाब विचारण्याची हिम्मत दाखवली नाही यावरून भाजप नेते कशाला
महत्व देतात ते उघडे पडले आहे.
भाजपच्या नेत्यांनी कोश्यारींची बाजू उचलून धरताना किती खालच्या
स्तरावर यावे याला काहीही सीमा दिसत नाही. या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने तर अक्कल गहाण ठेवत शिवाजी महाराज यांनी मोघल बादशहाला पाच
माफीपत्रे लिहिल्याचा निर्लज्ज मुद्दा पुढे करून स्वतःचे आणि पक्षाचे हसे
करून घेतले आहे. महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक आली की छत्रपतींची याचना किंवा आठवण केल्याशिवाय भाजपचे पानही हालत नाही मात्र गरज संपली की त्याच
दैवतांवर वाट्टेल ते बोलण्याचे अक्करमाशी प्रेम याच पक्षाच्या नेत्यांमध्ये कसे काय उफाळून येते हे आता इथल्या जनतेने ओळखायला हवे.
मराठा, शिव आणि महाराष्ट्र या शब्दांचा तिरस्कार भाजपचा छुपा अजेंडा असेल
तर तो एकदा त्यांनी जाहीर करून टाकावा म्हणजे जे लोक त्यांच्यावर अंधपणे
प्रेम करतात त्यानंतर दिवस चांदणे दिसायला लागेल.
हे केवळ शब्द नाहीत तर इथल्या कोट्यवधी मराठ्यांचा श्वास आहे.शिवराय ही आमची अस्मिता आहेत, त्याला वारंवार नख लावून किंवा त्याची वाट्टेल तशी मोडतोड करून तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकाल परंतु पंधरा कोटी मराठी माणसांना दीर्घकाळ बनवता येणार नाही हे लक्षात ठेवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इथे आल्यावर कंबरेचे हाड तुटेपर्यंत रायगडावर नतमस्तक होतात मात्र आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा त्यांच्याच
नोकराने केलेला प्रयत्न त्यांच्या लक्षात येत नसेल तर हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या छाताडावर नाचत तुम्ही त्यांच्या दैवतांचा,
महापुरुषांचा अपमान करता आणि तरीही महामहिम म्हणून इथे मिरवता असे केवळ याच राज्यात घडते आहे याचा विचार राज्यातील भाजपच्या मुखंडांनी करून
कोश्यारींची तात्काळ उचलबांगडी करायला हवी तरच तुम्ही शिवछत्रपतींवर आतून प्रेम करता असे म्हणता येईल.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा