नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला, आता उच्च न्यायालयात धाव घेणार

0

मुंबई : कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयावर मलिक उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (No Relief for NCP Leader Nawab Malik) वैद्यकीय कारणांसाठी नवाब मलिक यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या वतीने ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणात तपास यंत्रणांनी गोळा केलेले पुरावे पाहता सकृतदर्शी आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमध्ये तथ्य दिसत असून या परिस्थितीत त्यांना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


न्या. राहुल रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून याप्रकरणी निकाला दिला. त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असला तरी त्यांची रवानगी लगेच तुरुंगात होणार नसून ते रुग्णालयातच उपचार घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या मुद्यावर नवाब मलिक हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. सत्र न्यायालयाच्या आदेशाला आता तातडीने उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितले.


अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने जामीनास नकार दिल्याने मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात असून त्यांनाही जामीन मिळण्यात अडचणी येत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा