वाशिम :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारागृहात आहेत. मलिक यांच्या अडचणी वाढत असून वाशिम न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत (Case of Atrocity against NCP Leader Nawab Malik). एनसीबी माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालायने हे मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वानखेडे कुटुंबीयांची बदनामी केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले असून उद्याच यासंदर्भात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाने त्यांचा जामीनाचा अर्ज देखील फेटाळला आहे. समीर वानखेडे यांनी स्वतः वाशीम कोर्टात दाखल होत २४ ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती.
क्रूझवरील कथित ड्रगपार्टी आणि आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखडे यांनी केलेल्या कारवाईवरून तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते. त्यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसेच मलिक यांच्या जातीचे कादगपत्रे समोर आणत त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता. कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.