नागपूर : नागपूरमधील गोवारी दुर्घटनेला आज २८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोवारी शहीद स्मारक परिसरात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. राज्यभरातील गोवारी बांधव स्मारक परिसरात अभिवादनासाठी दाखल झाले.
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनकाळात २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यानंतर झिरो माईल चौकात गोवारी स्मारक उभारण्यात आले. गोवारी बांधवांचा २८ वा स्मृतिदिन साजरा झाला
या पार्श्वभूमीवर कैलास राऊत यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, २४ एप्रिल १९८५ पर्यंत गोवारींना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळत होत्या. पण २४ एप्रिलच्या शासननिर्णयात गोवारी हे गोंडगोवारीच्या नामसादृशाचा फायदा घेतात. गोवारी व गोंडगोवारी ही वेगळी जात आहे, असा उल्लेख असल्याने गोवारींना सवलती बंद झाल्या. त्याचा भडका २३ नोव्हेंबर १९९४ रोजी उडाला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आलेल्या गोवारींच्या मोर्चात प्रचंड चेंगराचेंगरी झाली आणि ११४ गोवारी बांधवांचा मृत्यू झाला. १५ जून १९९५ मध्ये गोवारींना एसबीसीच्या २ टक्के सवलती लागू केल्या. पण ३९ जातींचा त्यात समावेश केला. २००८ मध्ये आदिवासी गोवारी समाज संघटनेने उच्च न्यायालयात गोवारीच गोंडगोवारी असल्यासंदर्भात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर १४ ऑगस्ट २०१८ रोजी उच्च न्यायालयाने गोवारींच्या बाजूने निर्णय दिला. पण तत्कालीन लोकशाही आघाडी सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.