पुणे. मधुमेह (diabetes) हा गोड आजार भारतीयांचे जीवन पोखरतो आहे. देशात सुमारे साडेआठ टक्के मधुमेही आहेत. इतर अनेक आजारांना निमंत्रण देणारा घटकही मधुमेह हाच आहे. जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमधील आरोग्यदायी बदल हे व्यक्तींना मधुमेहमुक्त आणि पर्यायाने औषधमुक्त करण्यास मदत होते, हे हजारो व्यक्तींनी अनुभवले आहे. याबाबतच्या वैद्यकीय चाचण्या (clinical trial) सुरू असून त्यांचे अहवालही शोधनिबंध स्वरूपात लवकरच समोर येतील, अशी माहिती दीक्षित जीवनशैलीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित (Dr. Jagannath Dixit ) यांनी मधुमेह दिनी सोमवारी दिली. स्थुलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून असोसिएशन फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर) संस्थेच्या माध्यमातून डॉ. दीक्षित यांचे पूर्ण वेळ मधुमेहमुक्ती आणि समुपदेशन केंद्र पुणे आणि नागपूर येथे सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फोसिस फाउंडेशनचे सहकार्याने हे केंद्र चालविले जाणार आहे २१ नोव्हेंबरपासून पुणे तर १ डिसेंबरपासून नागपुरातील केंद्र कार्यरत होणार आहे. नागरिकांसाठी विनामूल्य समुपदेशन या केंद्रांमार्फत उपलब्ध असेल. या केंद्रांद्वारे रुग्णाची संपूर्ण माहिती संकलित करून यानंतर त्यांना मधुमेह मुक्ती आणि स्थुलत्व यांविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. वैयक्तिक समुपदेशन आणि मधुमेह तज्ज्ञांचे मार्गदर्शन रुग्णांना मिळणार असून हे सर्व विनामूल्य उपलब्ध असेल. रुग्णांच्या प्रकृतीचा वेळोवेळी पाठपुरावाही या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर हॉटेल शिवसागर शेजारील गल्लीत दुर्गाशंकर इमारतीमध्ये सोमवार ते शनिवार सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत हे केंद्र सुरू राहील. उद्घाटनाच्या निमित्ताने २१ ते ३० नोव्हेंबर दरम्यान या केंद्रावर ‘एचबीए १ सी’ ही रक्त चाचणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी १७ नोव्हेंबरपासून सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत केंद्रावर येऊन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नागपुरातही उद्घाटनानिमित्त हे उपक्रम राबविले जातील. देशात मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस वाढतो आहे. अशावेळी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.